प्रसूती रजेबाबत महत्वाचा निर्णय

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
 
नवी दिल्ली,
womens maternity leaveप्रसूती रजेवरून परतणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तिच्या पूर्वीच्या पदावरून काढून कमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे आता सोपे राहणार नाही. गर्भधारणा किंवा प्रसूतीमुळे महिलेच्या करिअरला हानी पोहोचू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले़
 
प्रसूती रजेवर जाण्यापूर्वी महिलेकडे जे पद आणि जबाबदाऱ्या होत्या, त्याच पदावर तिला पुन्हा रुजू करून घेतले पाहिजे. जर हे शक्य नसेल, तर तिला समान वेतन, पद, ज्येष्ठता, जबाबदारी आणि करिअरच्या संधींसह समकक्ष पद दिले पाहिजे. निकालात न्या. सचिन दत्ता यांनी एका महिला कर्मचाऱ्याला प्रसूती रजेनंतर व्यावसायिक हानी पोहोचवल्याच्या आरोपाखाली १० लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि खटल्याच्या खर्चापोटी १.५ लाख रुपये देण्याचा आदेश दिला.
 

court 
याचिकाकर्ती एक चार्टर्ड अकाउंटंट असून, तिला अंदाजे १४ वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. २०२२ मध्ये तिची एका कंपनीत मॅनेजर-अकाउंटिंग म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी तिचा मासिक पगार अंदाजे २.६ लाख रुपये होता. मे २०२३ मध्ये तिने कंपनीला गरोदरपणाबद्दल कळवले. त्यानंतर तिची दुसऱ्या टीममध्ये बदली करण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्ये तिने प्रसूती रजा घेतली आणि जुलै २०२४ मध्ये कामावर परतली.
प्रसूती रजेवरून परतल्यानंतर तिला तिच्या पूर्वीच्या पदावर आणि जबाबदाऱ्यांवर पुन्हा रुजू करून घेण्यात आले नाही. त्याऐवजी, तिची ट्रेझरी विभागात बदली करण्यात आली. या पदावर तिच्या हाताखाली कोणीही कर्मचारी नव्हते. तिला बऱ्याच काळासाठी व्यवस्थापकांच्या बैठकीतून वगळले होते. तिच्या पुरुष सहकाऱ्यांना वरिष्ठ व्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली़ परंतु तिला तिच्या पूर्वीच्या पदावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले नाही, असा आराेप याचिकाकर्तीने केला.