नवनीत राणा शेतकऱ्यांच्या बांधावर

नुकसानीची केली पाहणी

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अमरावती
navneet-rana जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाचा लहरीपणा, पिकांची झालेली नासाडी आणि उत्पादनात झालेली मोठी घट यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पृष्ठभूमीवर भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत रवि राणा यांनी तिवसा व मोर्शी तालुक्यातील विविध गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी केली.
 
 
navneet
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. अनेक शेतकऱ्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उत्पादन खर्चही निघण्याची परिस्थिती नसल्याची व्यथा नवनीत राणा यांच्यासमोर मांडली. तिवसा तालुक्यातील विविध भागांमध्ये पाहणी करताना सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांवर झालेल्या परिणामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचीही पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट व तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
यावेळी गायत्री देशमुख, प्रकाश साबळे, सोनाली नवले, ज्योती यावलीकर, अमित भांबुळकर, शांतनु देशमुख, धीरज केने, कृषी सहाय्यक राहुल पांडे, तलाठी रोशन देशमुख, सविता कडू, कृषी मंडळ अधिकारी धांडे, संदेश मेश्राम, अविनाश काळे यांच्यासह अन्य हजर होते.