१६ पाणी वापर संस्थांचे ठराव महिनाभरापासून प्रलंबित

खरीप पिकं वाचविण्यासाठी कालव्याचे पाणी सोडा

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अल्लीपूर, 
wardha water demandयंदा पाऊस कमी झाल्याने खरीप पिकांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. कपाशी, तूरसह अन्य खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर आहेत. खरीप हंगाम वाचविण्यासाठी निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गिरी यांनी केली आहे. पाणी सोडण्यासंदर्भात १६ पाणी वापर संस्थांचे ठराव महिनाभरापासून प्रलंबित आहेत, हे उल्लेखनिय! निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयाकडून कालव्यामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात केली जाते. मात्र, यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा न करता ऑक्टोबर महिन्यातच कालव्याचे पाणी सोडावे, अशी मागणी गिरी यांनी निवेदनातून केली आहे.
 
water wardha
 
देवळी आणि हिंगणघाट तालुक्यातील तब्बल १६ पाणी वापर संस्थांनी गेल्या महिनाभरापासून कालव्याचे पाणी सोडण्याबाबतचे मागणी ठराव संबंधित विभागाकडे सादर केले आहेत. मात्र, अद्याप या मागणीवर विभागाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतकर्यांनी पाणी मागणीचे ठराव सादर करूनही निर्णय प्रलंबित राहिल्याने पिकांचे नुकसान वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कानगाव परिसरातील गाडेगाव, अलमडोह, नांदगाव, रोहणखेडा, टाकळी दरणे, चाणकी आणि कानगाव या भागातील खरीप पिकांना सध्या पाण्याची मोठी आवश्यकता आहे. या परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच परतीचा पाऊसही थांबल्याने पिकांची चिंता वाढली आहे.
 
पिके ऐन वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा नियोजनबद्ध वापर करून कालव्याचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.