चिखली
birthday-gesture वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याच्या 'मुख्यमंत्री सहायता निधी'मध्ये तब्बल १ लाख रुपयांची भरीव मदत जमा केली आहे.
हल्ली वाढदिवसाच्या नावाखाली मोठे फ्लेक्स, डीजे आणि पार्ट्यांवर लाखो रुपये खर्च करण्याची पद्धत रूढ होत आहे. मात्र, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी या परंपरेला फाटा देत 'वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा' हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि इतर आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. बळीराजाच्या या वेदनांची आणि त्यांच्या प्रश्नांची जाणीव ठेवून बिडकर यांनी ही आर्थिक मदत केली आहे. विशेषतः संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार आहे.
एका प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या कामासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा प्रकारे मदतीचा हात पुढे करणे, ही निश्चितच समाजासाठी एक प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सध्या चिखली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून भरभरून कौतुक होत आहे. समाजातील इतर घटकांनी आणि अधिकाऱ्यांनीही असाच आदर्श घ्यावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.