नाशिक
ashok kharat case नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून, या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी आरोपींचे वकील राहुल कासलीवाल यांना पेनड्राईव्हमध्ये असलेले व्हिडीओ पाहण्याची परवानगी दिली आहे. सरकारी पक्षाने पेनड्राईव्हसह संबंधित कागदपत्रे आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवश्यक नियमांचे पालन करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अशोक खरात याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात आज खरातला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. मास्क लावून त्याला कोर्टात आणण्यात आले होते. सरकारी पक्षाच्या वतीने तपासी अधिकारी तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित होते.
न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रीय पुरावे देण्याचे निर्देश सरकारी पक्षाला दिले आहेत. मात्र, पेनड्राईव्हमधील व्हिडीओ पुराव्यांची प्रत आरोपी किंवा त्यांच्या वकिलांना देता येणार नाही. त्यांना हे व्हिडीओ केवळ न्यायालयाच्या निर्देशानुसार पाहता येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाला राजकीय ashok kharat case संदर्भही जोडला गेला असून, अशोक खरातचे विविध राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचे दर्शवणारे काही फोटो यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचीही चर्चा झाली होती. या प्रकरणाला काही ठिकाणी ‘महाराष्ट्राचे एपस्टीन फाईल’ असे संबोधण्यात आले आहे.
दरम्यान, खरातविरोधातील उर्वरित गुन्ह्यांची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी त्याच्यावरील पहिल्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर ३ ऑक्टोबरला निर्णय होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या जामीन निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.