अमरावती
burn-petrol-pump-employee-alive कुऱ्हा ते आर्वी रोडवरील मारडा येथील पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पाच फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दोन दुचाकींसह सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२९ सप्टेंबर रोजी यश राजेंद्र करपते (२२) याने कुऱ्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, रात्री तो व त्याचे सहकारी पेट्रोलपंप केबिनमध्ये झोपले असताना ८ ते ९ जण दुचाकींवरून आले. पेट्रोलपंप बंद असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी यशच्या दुचाकीतून पेट्रोल काढण्यास सुरुवात केली. यशने विरोध केला असता आरोपींनी शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून त्याला जखमी केले. त्यानंतर काढलेले पेट्रोल यशच्या अंगावर ओतून त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यशने आरडाओरड केल्याने आरोपी पसार झाले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संकेत येरपुडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे उघड केली.
संकेत सुभाषराव येरपुडे (१९), सुजल गंगाधर मुक्ते (२४), शुभम मनोज इंदोले (२३), कृष्णा राजू बत्तीशे (२१) आणि आर्यन श्रीकृष्ण वासनिक (१९) यांना ताब्यात घेण्यात आले. विशाल गरूड, निखिल गायकवाड, निहाल डोंगर, सोहम इंदोले व आरुष शेंडे हे पाच जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.