चंद्रपूर,
Chandrapur Crop Damageचंद्रपूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली असून, या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत.
याच अनुषंगाने वलनी येथील शेतकरी संतोष आत्राम यांच्या शेतामधील नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, मंडळ अधिकारी विशाल कुरेवार, तलाठी रमेश झिटे, पोलिस पाटील अशोक मेश्राम, ई-पीक पाहणी सर्व्हेअर विशाल गेडाम यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
पंचनाम्याचे काम नियोजनबद्ध व गतीने पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर तालुक्यात एकूण 11 पथक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गावांमध्ये संयुक्त पथकांमार्फत शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, प्रत्यक्ष नुकसानाची योग्य नोंद व्हावी तसेच पात्र शेतकर्यांची माहिती अचूकपणे संकलित व्हावी, यासाठी पंचनामे करताना संबंधित शेतकर्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान पिकांची सद्यस्थिती व नुकसान याबाबत आवश्यक माहिती नोंदविण्यात येईल.
संयुक्त पथकांमार्फत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या याद्या संबंधित गावाच्या चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांना पंचनाम्यामध्ये आपल्या नुकसानीची नोंद झाली आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्तरावरच उपलब्ध होणार आहे.