पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाचीच जबाबदारी

वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांचे प्रतिपादन, ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत विद्यार्थ्यांना रोपट्यांचे वाटप

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नागपूर
ek-ped-maa-ke-naam-initiative पर्यावरण संरक्षण हा विषय पूर्वापार महत्त्वाचा राहिला आहे. पण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने या कामात आपला वाटा उचलला पाहिजे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नागपूर प्रादेशिक वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी केले.

van vibhag
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने पर्यावरण रक्षणासाठी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत हा कार्यक्रम शाळांमधून घेण्यात येतो. प्रत्येक शाळेत इको क्लब प्रस्थापित केले आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी एक वृत्तपट दाखविला जातो. तसेच पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना करून दिला जातो. याविषयीची एक विशेष पुस्तिका आणि रोप विद्यार्थ्यांना नि:शुल्क दिले जाते. सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक पद्मनाभ एच. एस. आणि विभागीय वन अधिकारी नंदकिशोर राऊत यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे. याचे समन्वयन ‘मीनल डोर्लीकर कॅम्पिंग ३६० डिग्री’ यांच्याकडे आहे.
 
या अंतर्गत त्रिमूर्ती नगर भवन्स शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जी. गुरुप्रसाद यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मानवाला चांगले जगायचे असेल तर उत्तम पर्यावरण आवश्यक आहे. याचे जतन करणे किती गरजेचे आहे, हे लोकांना समजते. यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असेही त्यांना वाटत असते. पण, नुसते वाटून काहीही साध्य होणार नाही. यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर पुढाकार घ्यायला हवा. आपले छोटेसे योगदानही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मोठे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले.
 
विभागीय अधिकारी नंदकिशोर राऊत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक मोलाची माहिती देत वनसेवेचे क्षेत्र करिअर म्हणून कसे निवडावे, यासाठीही मार्गदर्शन केले. प्राण्यांचे जीवन कसे असते, त्यांच्या आहार-विहाराच्या पद्धती कशा असतात, याविषयी मुलांशी त्यांनी सहज सोप्या भाषेत संवाद साधला. यावेळी जी. गुरुप्रसाद, पद्मनाभ एच. एस., नंदकिशोर राऊत, मुख्याध्यापिका पार्वती अय्यर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात रोपटे तसेच पुस्तिका देण्यात आली. जवळपास २०० विद्यार्थ्यांना पुस्तिकेसह रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगाशे, सामाजिक वनीकरण नागपूर, वनरक्षक बी. एम. शिंदे व वनपाल आशा वैद्य यांनी परिश्रम घेतले.