दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषीपंपांना दिवसा १२ तास विजपुरवठा

प्रत्यक्षात खंडित विज पुरवठ्याने शेतकरी हैरान

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड, 
farmer 12 hour power supplyदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषीपंपांना रात्रीऐवजी दिवसा थ्री-फेज विजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महावितरणने हालचाली सुरू केल्या आहेत. कृषी वीजवाहिन्या आणि गावठाण विजवाहिन्यांचे विलगीकरण झालेले आहे, अशा भागांमध्ये कृषीपंपांना केवळ दिवसाच्या कालावधीत थ्री-फेज वीजपुरवठा करावा, तर घरगुती ग्राहकांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना महावितरणने अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार कारंजा तालुयात मागील दोन दिवसापासून कृषीसाठी दिवसा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असा १२ तास विजपुरवठा केला जात आहे. १२ तास केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वारंवार वीजपरवठा खंडित होत असल्याने शेतकर्‍यांना केवळ ६ ते ८ तासच वीज मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
 

agri 
 
 
शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन विजपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी कृषीपंपांना दिवसाच्या कालावधीतच थ्री-फेज वीज उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ज्या भागांमध्ये कृषी व गावठाण विजवाहिन्यांचे विलगीकरण पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी कृषीपंपांना दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या कालावधीत संबंधित वाहिनीवरून घरगुती वापरासाठी सिंगल-फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांना रात्री वीज मिळणे शय होणार असून, कृषीपंपांसाठी दिवसा स्वतंत्र विजपुरवठा करता येत आहे.
 
 
मात्र, ज्या भागांमध्ये अद्याप वाहिनी विलगीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही, तेथे कृषीपंपांना सध्या चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. अशा भागांत एक आठवडा दिवसा, तर पुढील आठवडा रात्रीच्या पाळीत थ्री-फेज विजपुरवठा केला जात आहे. उर्वरित भागातील वाहिनी विलगीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाने दिल्या आहेत.
 
 
महावितरणकडून कृषीपंपांना दिवसा विजपुरवठ्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. त्यामुळे ‘दिवसा वीज’ ही घोषणा प्रत्यक्ष शेतात कितपत प्रभावी ठरते, हा प्रश्न कायम आहे. कृषीपंप सुरू करण्यासाठी मिळणार्‍या मर्यादित वेळेतच वारंवार वीज खंडित झाली तर शेतकर्‍यांना अपेक्षित लाभ मिळणार नाही.दुष्काळाच्या काळात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांसाठी महत्त्वाचा असल्याने कृषीपंपांसाठी दिवसा अखंड, स्थिर आणि पुरेसा थ्री-फेज वीजपुरवठा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वेळापत्रक जाहीर करण्याऐवजी प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे आहे.