आता दारू विक्रेत्यांसह पिणार्‍यांवरही दंडाचा बळगा!

गोरेगावच्या मुंडीपारात दारूबंदीचा एकमताने ठराव, एक हजारांहून अधिक ग्रामस्थांची उपस्थिती

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
गोंदिया
fine alcohol गावातील वाढत्या दारूच्या विक्री व सेवनाला आळा घालण्यासाठी गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ग्रामस्थांनी दारूबंदीचा एल्गार पुकारला असून बुधवारी ३० सप्टेंबर रोजी तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित ग्रामसभेत सुमारे एक हजारांहून अधिक ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेत दारूबंदीच्या मागणीला ठाम पाठिंबा दिला. दरम्यान, एकमताने गावात दारूबंदीचा ठराव पारीत करण्यात आला असून ग्रामसभेत दारू विक्री करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला असताना दारूचे सेवन करणार्‍यांवरही दंडाची तरतूद करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
 
fine
दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई होत असताना दारूचे सेवन करणार्‍यांनाही जबाबदार धरले पाहिजे, असा सूर ग्रामसभेत उमटला त्यामुळे मुंडीपारमध्ये दारूबंदीचा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता न राहता ग्रामस्थांच्या सामूहिक निर्णयाचा विषय बनला आहे. ग्रामसभेच्या आयोजनात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावचे पोलिस पाटील यांची भूमिका राहिली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दारूची विक्री, खरेदी आणि सेवनासंदर्भात कायदेशीर तरतुदी आहेत. तसेच अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभेला दारूच्या विक्री व सेवनावर बंदी, नियमन किंवा निर्बंध आणण्याचा अधिकार कायद्यात नमूद आहे.
 
दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावासंबंधीही कायद्यात विशिष्ट प्रक्रिया नमूद आहे. त्यामुळे मुंडीपार ग्रामसभेच्या निर्णयाची अधिकृत नोंद, ठरावाची प्रत आणि पुढील कायदेशीर कार्यवाही संबंधित प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नियमानुसार होणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, गावात दारूबंदी बाबत नियमावली तयार करण्यात आली असून अवैध दारु विक्रेत्यावर ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. व दंड न भरल्यास पोलिसांच्या स्वाधिन केले जाणार आहे. तर याची माहिती देणार्‍यास १० हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. विशेषतः गावाच्या हद्दीत कुणीही दारू पिताना आढल्यास ५ हजार रुपये दंड तर माहिती देणार्‍यास २ हजार रुपये बक्षिस दिले जाईल. विशेष म्हणजे, दारू बंदी समितीतील कुणीही सदस्य दारू पिताना आढळल्यास त्याचेवर १० हजार रुपये दंड तर बाहेर गावातून दारु पिऊन आल्यास व घरी किंवा गावात वाद केल्यास ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असून दंडाची रक्कम महात्मा गांधी तंटामुक्त समिती कडे जमा केला जाणार आहे.