मुंबई
kubbra sait बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्री आणि सहकलाकार कोमल राणी स्वर्णकरसोबत गोविंदा विविध ठिकाणी एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू झाले. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही गोविंदा आणि कोमल राणी एकत्र दिसले होते. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कुब्रा सैत गोविंदाच्या समर्थनार्थ पुढे आली असून, कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर तिने सवाल उपस्थित केला आहे.
कुब्रा सैतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत गोविंदा आणि कोमल राणी यांच्या कथित अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. एखाद्या कलाकाराचा चाहता असण्यापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चौकशी करण्यापर्यंत लोक कधी पोहोचले, असा प्रश्न तिने उपस्थित केला. गोविंदाचे चित्रपट पाहत आपण मोठे झालो असून, ९०च्या दशकातील तो एक मोठा सुपरस्टार, आयकॉन आणि लिजेंड असल्याचेही कुब्राने म्हटले.
एखादी महिला एखाद्या अभिनेत्यासोबत किंवा त्याच्या आसपास दिसली की, लगेच तिला ‘मिस्ट्री गर्ल’ किंवा ‘कथित गर्लफ्रेंड’ अशी लेबले लावली जातात, यावरही कुब्राने नाराजी व्यक्त केली. गोविंदाला आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र, त्याची पत्नी सुनीता अहुजा हिची आपली भेट झाली असून, सुनीता स्पष्टवक्ती आणि विनोदी स्वभावाची असल्याचे कुब्राने सांगितले.
अफवा पसरल्यानंतर सुनीता अहुजा किंवा अन्य कोणत्याही महिलेला वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागते, या प्रकारावर कुब्राने प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे तिने नमूद केले. महिलांच्या सन्मानाचा मुद्दा मांडताना, महिलांचा आदर केवळ एखादी मोठी किंवा गंभीर घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापुरता मर्यादित नसावा, असेही ती म्हणाली.
महिलांच्या निवडी आणि वैयक्तिक निर्णयांचा रोजच्या आयुष्यातही आदर केला पाहिजे, असे कुब्राने सांगितले. कोणत्याही महिलेला तिच्या आयुष्याबाबत किंवा निर्णयांबाबत वारंवार स्पष्टीकरण देण्यास भाग पाडू नये, असेही तिने स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीबद्दल सकारात्मक बोलता येत नसेल, तर त्याबद्दल काहीही न बोलता कलाकाराच्या कलेचा एक चाहता म्हणून आनंद घ्यावा, असा सल्लाही कुब्राने दिला.
दरम्यान, गोविंदा kubbra sait आणि कोमल राणी स्वर्णकर यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना विमानतळावरील तसेच लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी झालेल्या त्यांच्या एकत्र उपस्थितीमुळे सुरुवात झाली होती. मात्र, गोविंदाने या चर्चांना फेटाळून लावत कोमलसोबतचे आपले नाते पूर्णपणे व्यावसायिक असल्याचे स्पष्ट केले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनामागे ‘रूपा’ या आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्याचा उद्देश असल्याचेही त्याने सांगितले.
या अफवा आपल्याला कुटुंबापासून दूर करण्याचा आणि आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही गोविंदाने केला आहे. त्यामुळे गोविंदाच्या स्पष्टीकरणानंतरही सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कुब्रा सैतची भूमिका आता चर्चेत आली आहे.