आकाशात थरार! विमान हायजॅकचा संशय

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
तेल अवीव,
plane-hijacking दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात बुधवारी हवेतच गंभीर प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. विमानाने प्रथम 7700 हा आपत्कालीन संकेत आणि त्यानंतर 7500 हा बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा संभाव्य विमान अपहरणाशी संबंधित संकेत प्रसारित केला. या घटनेनंतर इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने सज्ज करण्यात आली. विमान अखेर सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. फ्लायदुबईनेही विमान सुरक्षित उतरल्याचे आणि सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

plane-hijacking
 
सुरुवातीला विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये जोरदार झटापट झाल्याची माहिती समोर आली होती. या संघर्षादरम्यानच आपत्कालीन संकेत सक्रिय झाल्याचे सांगण्यात आले. काही प्रवाशांनी कॉकपिटमधून आरडाओरड ऐकू आल्याचे सांगितले असून, एका वैमानिकावर चाकूने हल्ला झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, या हल्ल्याच्या तपशीलांची स्वतंत्रपणे पूर्ण पुष्टी झालेली नाही. घटनेनंतर विमानाने अचानक मोठ्या प्रमाणात उंची कमी केली आणि त्यानंतर त्याचा मार्ग सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आला.
दरम्यान, इस्रायली अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात या घटनेबाबत अधिक गंभीर शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही इस्रायली वृत्तांनुसार, ओमानचा नागरिक असलेल्या सहवैमानिकाने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि विमान पाडण्याचा त्याचा हेतू असण्याची शक्यताही तपासली जात आहे. या दाव्यानुसार दुसऱ्या वैमानिकाने कर्मचारी आणि काही प्रवाशांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या संशयिताचा नेमका हेतू काय होता, याबाबत तपास अद्याप सुरू आहे.
विमानात १०० हून अधिक इस्रायली नागरिकांसह सुमारे १५० ते १८० प्रवासी असल्याचे विविध वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. विमान तबूक येथे सुरक्षित उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सौदी अरेबियात इस्रायली प्रवासी अडकल्याने त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी इस्रायली प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, विमानात नेमके काय घडले, 7500 संकेत का देण्यात आला आणि ओमानी सहवैमानिकावरील आरोपांचे स्वरूप काय आहे, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.