मृत्यूचक्र’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

२३ ऑक्टोबरला महाराष्ट्रभर रहस्याचा उलगडा

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
मुंबई
mrutyuchakra मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि वेगळ्या धाटणीच्या कथांना प्रेक्षकांकडून कायमच प्रतिसाद मिळाला आहे. याच परंपरेत मानवी अस्तित्व, कर्म, मृत्यूचे अटळ चक्र आणि अनाकलनीय घटनांभोवती गुंफलेला ‘मृत्यूचक्र’ हा सस्पेन्स-थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील रहस्यमय वातावरणामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
 

mrutyuchakra trailer released, marathi suspense thriller to hit theatres on october 23 
श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू-गंगावणे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलर लाँच सोहळ्याला सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि उपाध्यक्ष धनाजी यमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘मृत्यूचक्र’च्या ट्रेलरमध्ये गूढ घटनांची मालिका, प्राचीन वास्तू, अंधाराचे सावट, सिरीयल किलरची दहशत आणि भय निर्माण करणारे वातावरण पाहायला मिळते. एका गूढ चक्राची चाहूल, हॉस्पिटलमधील प्रसंग, वैद्यकीय वास्तव आणि मानवी आकलनाच्या पलीकडील शक्ती यांच्यातील संघर्ष कथानकातील रहस्य अधिक गडद करतो. गावाकडच्या वातावरणाशी जोडलेली व्यक्तिरेखांची वेशभूषा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील गूढ भावही कथेत दडलेल्या रहस्याची झलक देतात.
‘सुरुवात तिथेच होते, जिथे शेवट झाला होता, चक्र मृत्यूचे – मृत्यूचक्र…’ हा ट्रेलरमधील संदेश चित्रपटाच्या कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण करतो. ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ या वाक्यामुळे या रहस्याभोवती आणखी प्रश्न निर्माण होतात.
दिग्दर्शकांच्या मते, ‘मृत्यूचक्र’ हा केवळ रहस्य आणि थरारावर आधारित चित्रपट नसून, मृत्यू, कर्म आणि मानवी अस्तित्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा अनुभव आहे. ट्रेलरमध्ये कथानकाची केवळ झलक देण्यात आली असून, घटनांमागील गूढ आणि त्यांच्यातील दुवे जाणूनबुजून प्रेक्षकांपासून लपवण्यात आले आहेत. चित्रपटगृहात पोहोचेपर्यंत ही उत्सुकता कायम राहावी, असा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले. चित्रपट संपल्यानंतरही काही प्रश्न प्रेक्षकांच्या मनात राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शलाका गाडे, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ आणि अनिल रबाळे यांच्या भूमिका आहेत.‘मृत्यूचक्र’ची मूळ कथा डॉ. सुधीर निकम यांची असून, पटकथा आणि संवाद विलास वाघमोडे आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. रोहन शहा हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. जयेश मिस्त्री यांच्या यूजेएम नेटवर्क्स अँड एंटरटेनमेंट एलएलपीच्या माध्यमातून चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रात वितरण केले जाणार आहे.चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांनी दिले आहे. वलय मुळगुंद यांच्या गीतांना सुहास सावंत आणि शमिका भिडे यांनी आवाज दिला आहे. छायांकनाची जबाबदारी निशांत भागवत यांनी सांभाळली असून, राहुल भातणकर यांनी संकलन केले आहे. मयूर पवार प्रोडक्शन डिझायनर, कुणाल वेदपाठक कला दिग्दर्शक, किर्ती जंगम जोशी वेशभूषाकार आणि संतोष गायके रंगभूषाकार आहेत. अशा तांत्रिक आणि कलात्मक टीमसह ‘मृत्यूचक्र’ २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे.