आकार बिल्डरच्या फ्लॅटमध्ये अवैध हुक्का पार्लर

सदर पोलिसांची कारवाई; मालक, वेटरसह दोन ग्राहकांवर गुन्हा

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
hookah parlour बैरामजी टाउन येथील आकार बिल्डरच्या एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध हुक्का पार्लरवर सदर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत फ्लॅट मालक, वेटरसह दोन ग्राहकांना हुक्का देताना आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी १२ हजार ३२५ रुपयांचा हुक्का व तंबाखूजन्य साहित्य जप्त केले आहे.
 

nagpur hookah parlour raid: illegal setup found in builder’s flat 
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (२८ सप्टेंबर) दुपारी ३.४५ ते ४.२० वाजताच्या सुमारास आकार बिल्डर, बिल्डिंग क्रमांक ९, फ्लॅट क्रमांक २ येथे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचांसमक्ष पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी फ्लॅट मालक देवकुमार रमेश झांझोटे (४१) आणि वेटर हर्ष विजय कंगाले (२०, रा. रहाटे कॉलनी, धंतोली) हे शांतिनगर येथील लक्की सुरेश आहुजा (२७) आणि यश दिनेश आहुजा (२७) या दोघांना तंबाखूयुक्त हुक्का देताना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हुक्का पॉट, तंबाखूयुक्त फ्लेवर आणि अन्य साहित्य असा एकूण १२ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आर्थिक लाभाच्या उद्देशाने कोणतीही परवानगी नसताना फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सदर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.