अनिल कांबळे
नागपूर,
nagpur rape case पतीच्या मित्राने २६ वर्षीय महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि घटनेची वाच्यता केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी शाहरुख हसन शेख (२६, रा. शिवाजी चौक झोपडपट्टी, यशोधरानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गरीब नवाज नगर परिसरात १० मे ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र असून, त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणे होते. एकदा महिला घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपीकडून आपल्याला सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. महिलेने २८ सप्टेंबर रोजी यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६४(२)(एम), ३५१(३) तसेच संबंधित जुन्या कायद्यातील कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून, यशोधरानगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.