अनिल कांबळे
नागपूर,
road accident भरधाव डंपरने एका ई-स्कूटरला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिची मैत्रिण गंभीर जखमी झाली. याअपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला; मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेत डंपरसह चालकाला ताब्यात घेतले. मृत तरुणीची ओळख मुस्कान देवाचंद खियालदासानी (१९, रा. जरीपटका) अशी झाली आहे. तर राजलक्ष्मी लोखंडे असे जखमीचे नाव आहे.
मुस्कान ही बोखरा येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मुस्कान ही राजलक्ष्मी लोखंडे हिच्या ई-स्कूटरवरून प्रवास करीत होती. गोधनीकडून झेंडा चौकाच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. धडकेनंतर मुस्कान डंपरच्या मागील भागाखाली आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीचालक राजलक्ष्मी ही जखमी झाली. अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. पोलिसांनी दामोदर सिताराम सहारे (६१, रा. नारी, कपिलनगर) याला ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातील डंपरही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अपघात नेमका कसा घडला आणि त्यासाठी कोणाची जबाबदारी आहे, याचा तपास केला जात आहे.