छेडखानी-विनयभंगाला नागपुरात ‘ब्रेक’!

‘व्हिसीबल पोलिसींग’चा धाक; निर्भया-दामिनी पथकांच्या गस्तीचा परिणाम

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर

molestation cases राज्यातील महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत असताना नागपूर शहरातून मात्र दिलासादायक चित्र समोर आले आहे. महिलांचा विनयभंग, छेडखानी आणि सार्वजनिक ठिकाणी त्रास देणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘व्हिसीबल पोलिसींग’चा परिणाम दिसू लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑगस्टअखेरपर्यंत नागपूर शहरातील विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल १५ टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, दाखल गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी तपासाची गती कायम ठेवत ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांचा निपटारा केला आहे.
 

nagpur sees 15% drop in molestation cases till august 2026 
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची घोषणा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केली होती. त्यानंतर शहरातील महिला सुरक्षेच्या यंत्रणेला अधिक सक्रिय करण्यात आले. निर्भया आणि दामिनी पथकांची गस्त वाढविण्यासोबतच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढविण्यात आली. शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक परिसर आणि महिलांची मोठी वर्दळ असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये विनयभंगाचे ३५३ गुन्हे शहरात दाखल झाले होते. त्यापैकी ३४४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यंदा २०२६ मध्ये ऑगस्टअखेरपर्यंत ३०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २९२ गुन्ह्यांचा निपटारा करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ५३ गुन्हे कमी नोंदविण्यात आले आहेत. उपलब्ध कालावधीतील तुलनेनुसार ही घट सुमारे १५ टक्के आहे. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर देण्यात येत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
रस्त्यावर पोलिसांचा ‘धाक’
महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस सक्रिय होण्याऐवजी गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांची उपस्थिती जाणवावी, यावर ‘व्हिसीबल पोलिसींग’मध्ये भर आहे. निर्भया पथकांकडून गर्दीच्या ठिकाणी गस्त घातली जात असून संशयास्पद हालचाली, महिलांचा पाठलाग, छेडखानी अथवा त्रास देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणाऱ्यांना पोलिसांची भीती वाटावी आणि पीडित महिलेला तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंत जाण्याची मानसिक अडचण राहू नये, यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. तक्रार मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्याच्या पद्धतीमुळे महिलांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 

निर्भया, दामिनी पथकांसह सक्रिय
महिला सुरक्षेसाठी निर्भया आणि दामिनी पथकांसोबतच सामाजिक सुरक्षा विभाग तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग यांनाही सक्रिय करण्यात आले आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा दाखल करून तपास लांबणीवर टाकण्याऐवजी उपलब्ध आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यामुळे ‘गुन्हा घडला तर कारवाई होणारच’ असा संदेश देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे.
 
 
आकडेवारीतील घट टिकविण्याचे आव्हान
विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये झालेली घट निश्चितच पोलिसांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महत्त्वाची आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, तक्रारींची तातडीने दखल घेणे आणि आरोपींवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यावर पोलिसांचा भर आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
 

nagpur sees 15% drop in molestation cases till august 2026 
- नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त, नागपूर शहर)