तीन महिन्यांपासून ‘बीन पगारी’ प्रशिक्षणार्थी पोलिस!

मेसचा खर्चही घरच्यांच्या खिशातून; वेतन रखडल्याने आर्थिक संकट

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

salaries पोलिस दलात भरती होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रशिक्षणाच्या काळातही नियमित कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. स्वतःच्या दैनंदिन खर्चासह जेवणाच्या मेसचे शुल्क भागविण्यासाठीही अनेक प्रशिक्षणार्थींना आई-वडिलांकडून पैसे मागावे लागत असल्याचे चित्र आहे.
 

 salaries 
पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणून निवड झाल्यानंतर साधारण ९ महिन्यांचे प्रशिक्षण अनिवार्य असते. हे प्रशिक्षण राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या सुरुवातीपासूनच वेतन देण्याची तरतूद आहे. या वेतनातून ते स्वतःचा खर्च भागविण्यासोबतच कुटुंबीयांनाही आर्थिक हातभार लावत असतात. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतनच मिळत नसल्याने प्रशिक्षणार्थींची आर्थिक गणिते बिघडली आहेत. विशेष म्हणजे, प्रशिक्षणार्थी असले तरी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली जाते. शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते. या काळात ते इतर पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असतात. मात्र, दुसरीकडे त्यांचे नियमित वेतनच रखडल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन ते चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने थकीत वेतन कधी मिळणार, याकडे प्रशिक्षणार्थींचे लक्ष लागले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस दलात सेवा बजावण्याची तयारी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

घरून पैसे मागण्याची वेळ
वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खर्चासाठी घरच्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशिक्षण केंद्रातील मेसचा खर्च, प्रवास, मोबाईल रिचार्ज तसेच इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घरून पैसे मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोलिस दलात नोकरी लागल्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची अपेक्षा असताना उलट कुटुंबीयांकडूनच पैसे घ्यावे लागत असल्याने अनेक प्रशिक्षणार्थींमध्ये अस्वस्थता आहे.
आम्ही पोलिस दलात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा आईवडिलांची असते. मात्र, आता त्यांनाच खर्चासाठी पैसे मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खर्चसुद्धा जपून करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तर पोलिसांची सेवार्थ आयडी ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांचे वेतन रखडले असून येत्या चार ते पाच दिवसांत अदा करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.