अर्जुनी मोरगाव
mla-badole जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामातील धानपिकाकडून शेतकर्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, सद्यस्थितीत विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात तुडतुडा आणि करपा रोगाचा धानपिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या दौर्यावर असताना जानव्हा परिसरातील शेतकर्यांच्या शेतावर जाऊन धानपिकाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणार्या संभाव्य नुकसानीची माहिती जाणून घेतली. जानव्हा येथील शेतकरी किशोर ब्राह्मणकर तसेच परिसरातील अनेक शेतांमध्ये धानपिकावर तुडतुडा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे शेतकर्यांनी आ. बडोले यांच्या निदर्शनास आणून दिले. आधीच वाढता उत्पादन खर्च, खत-बियाण्यांचे वाढलेले दर आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी अडचणीत असताना आता रोगराईमुळे आर्थिक संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने पाहणी करून बाधित क्षेत्राचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकर्यांना आवश्यक मार्गदर्शन, कीडनियंत्रणाच्या उपाययोजना आणि आवश्यक फवारणी बाबत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्य जयश्री देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी जि. प. सदस्य किशोर तरोणे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, जानवा येथील सरपंच तथा शेतकरी किशोर ब्राह्मणकर, हितेश डोंगरे उपस्थित होते.