ठाणे,
Pradeep Purnekar murder case मानपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी तब्बल 5 राऊंड फायर केल्याची माहिती आहे. यातील 2 गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या मानेवर, तर दुसरी पायावर लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याशिवाय धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर, पोटावर आणि हातावरही वार करण्यात आले.या गंभीर हल्ल्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे याला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी पप्या शिंदे हा पूर्णेकर यांच्यासोबतच असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गोळीबार झाल्यानंतर जखमी पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठीही पप्या शिंदे सोबत होता. मात्र, तपासादरम्यान त्याच्या भूमिकेबाबत पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून पप्या शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर यांच्यात बोलणे बंद असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मागील 10 ते 15 दिवसांपासून पप्या शिंदे पुन्हा पूर्णेकर यांच्या संपर्कात होता. दोघांची जुनी मैत्री असल्याची माहिती असून पप्या शिंदे याच्यावर सन 2004 पासून आतापर्यंत 8 ते 9 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर 2014 मध्ये त्याला तडीपार करण्यात आले होते.पोलिसांच्या तपासानुसार, पप्या शिंदे आधीपासूनच प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात मित्र म्हणून बसला होता. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्याने इतर आरोपींना कथितरित्या हल्ल्याची हिंट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर कनोजिया उर्फ टल्ली आणि आणखी एका शूटरने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. तर अन्य दोन आरोपींनी चोपर आणि चाकूने पूर्णेकर यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, पप्या शिंदे घटनास्थळीच थांबला आणि प्रदीप पूर्णेकर यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांच्यासोबत होता. त्याच्या हालचाली आणि भूमिकेबाबत पोलिसांना संशय निर्माण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, पप्या शिंदेनेच इतर आरोपींना कार्यालयात आणल्याचा आरोप असून या संपूर्ण कटात त्याचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या हल्ल्यामागे राजकीय तसेच सोशल कारणांवरून निर्माण झालेला वाद असल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे. प्रकरणातील चार आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी क्राइम ब्रांचसह 9 ते 10 पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.