नागपूर,
education-excellence-award शैक्षणिक क्षेत्र, शैक्षणिक नेतृत्व आणि सामाजिक विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत स्क्रॅच टू स्केल मीडियाच्या वतीने श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. माधुरी अनिल यावलकर यांना ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते नागपुरातील हॉटेल तुली इम्पेरियल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करत नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रा. यावलकर यांनी दिलेले मार्गदर्शन तसेच शिक्षणाच्या विकासासाठी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांचे कार्य केवळ शाळा आणि महाविद्यालयापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचले आहे.
आदिवासी भागांसह गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैत्री परिवार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील निष्ठावान कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.