नागपुरात झालं राहुल गांधी यांचं मेडिकल चेकअप!

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Rahul Gandhiराजकीय आंदोलन म्हटले की घोषणाबाजी, फलक आणि निदर्शने हे नेहमीचे चित्र. मात्र नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाने आंदोलनाचा चक्क ‘मेडिकल रिपोर्ट’च तयार केला! राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला थेट प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारात आणत त्याचे ‘चेकअप’ करण्यात आले आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
 
 
rahul
या अनोख्या आंदोलनात भाजयुमोच्या ऍड.प्रशंसा भोयर यांनी डॉक्टरची भूमिका साकारत राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तपासणी केली. तपासणीनंतर ‘डॉक्टरां’नी संबंधित रुग्णावर तातडीने उपचार करण्याची गरज असल्याचा ‘निष्कर्ष’ काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राजकीय टीकेचा समाचार घेतला.
 
 
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी सातत्याने भारतीय जनता पक्षावर नकारात्मक टीका-टिप्पणी करतात. विविध विषयांवर ते सातत्याने आरोप करत असल्याने त्यांच्या वक्तव्यांवर उपरोधिक भाष्य करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘मानसिक उपचारांची गरज’ असल्याचा टोला आंदोलनकर्त्यांनी लगावला.
 
 
या आंदोलनामुळे काही काळ प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात राजकीय रंगत निर्माण झाली. डॉक्टरांच्या वेशातील कार्यकर्ता, प्रतीकात्मक रुग्णाचा पुतळा आणि त्याची ‘तपासणी’ पाहण्यासाठी उपस्थितांमध्येही उत्सुकता निर्माण झाली. भाजयुमोचे नागपूर शहर अध्यक्ष सचिन करारे, तसेच प्रशांसा भोयर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेवर आणि वक्तव्यांवर उपरोधिक पद्धतीने टीका केली.
 
दरम्यान, आंदोलनात करण्यात आलेली ‘तपासणी’ आणि ‘रुग्णालयात भरती’ ही संपूर्ण कृती प्रतीकात्मक आणि राजकीय उपरोधाचा भाग होती.