विमल इलायची’ जाहिरात प्रकरणात शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफचं कायदेशीर उत्तर

म्हणाले, ‘करार फक्त माउथ फ्रेशनरसाठी’

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
मुंबई
vimal elaichi ‘विमल’ इलायचीच्या जाहिरातीवरून बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत आले होते. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तिन्ही कलाकारांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत नोटीस बजावली होती. आता या नोटिशीला तिन्ही अभिनेत्यांनी कायदेशीर उत्तर दिले असून, त्यांचा करार पान मसाला किंवा कोणत्याही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिरातीसाठी नसून केवळ माउथ फ्रेशनर अर्थात इलायचीच्या उत्पादनासाठी असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.
 

vimal elaichi 
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत एकत्र दिसतात. मात्र, FDAच्या म्हणण्यानुसार, या जाहिरातीमुळे ‘विमल’ या ब्रँडचा संबंध पान मसाल्याशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे ही जाहिरात प्रत्यक्षात सरोगेट जाहिरातीच्या स्वरूपात येते का, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणात FDAने तिन्ही कलाकारांकडून जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यासोबतच कराराची प्रत, कॅम्पेन ब्रीफ, मानधन तसेच अन्य संबंधित कागदपत्रेही सादर करण्यास सांगण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तिन्ही अभिनेत्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. कलाकारांचा करार केवळ माउथ फ्रेशनर म्हणजेच इलायचीच्या जाहिरातीसाठी करण्यात आला असून, कोणत्याही प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनाच्या प्रचारासाठी तो केलेला नाही, असा दावा त्यांच्या वतीने करण्यात आला.
महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणात आतापर्यंत दोन औपचारिक सुनावण्या झाल्याची माहिती दिली आहे. जाहिरातीची मांडणी, संबंधित ब्रँडशी तिचा असलेला संबंध आणि लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदी या सर्व बाबींचा FDAकडून आढावा घेतला जात आहे. त्यामुळे ‘विमल इलायची’ची जाहिरात स्वतंत्र माउथ फ्रेशनर उत्पादनाची जाहिरात आहे की सरोगेट प्रमोशनचा प्रकार आहे, याबाबतचा अंतिम निर्णय तपासानंतरच होणार आहे.
महाराष्ट्रात तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी आहे. 2026 मध्येही या बंदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अशा उत्पादनांच्या थेट तसेच अप्रत्यक्ष जाहिरातींवर FDAकडून विशेष लक्ष दिले जात आहे. यापूर्वीही प्रशासनाने संबंधित कलाकारांकडून जाहिरात थांबवण्याबाबत तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रमोशनल कंटेंट हटवण्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते.
दरम्यान, सेलिब्रिटींनी जाहिराती स्वीकारताना अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही केले होते. 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांनी चित्रपट कलाकारांना सार्वजनिक आरोग्यासाठी घातक ठरू शकणाऱ्या उत्पादनांची जाहिरात न करण्याचे आवाहन केले होते. ‘खरा स्टार तोच असतो जो प्रकाश पसरवतो, अंधार नाही,’ असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.
आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या वकिलांनी मांडलेल्या भूमिकेनंतर या जाहिरातीचे स्वरूप आणि ‘विमल’ ब्रँडशी तिचा संबंध याबाबत FDAच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.