अखेर सोमठाणा-दिघी-उंबर्डा मार्गावर एसटीसेवा सुरू

विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर फुलला आनंद,चालक वाहकाचा सत्कार

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड,
st-bus-service ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय अखेर दूर झाली असून, कारंजा ते खरडगाव जाणारी एसटी बससेवा आता सोमठाणा—दिघी—उंबर्डा मार्गावरून दररोज नियमित सुरू करण्यात आली आहे. बससेवा सुरू झाल्याने सोमठाणा, दिघी व परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
 
 
st-bus-service
 
शाळेत जाण्यासाठी नियमित सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, तर काही विद्यार्थ्यांना पायी अथवा इतर साधनांनी शाळेत जावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामस्थ व संबंधितांनी एसटी बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, सोमठाणा—दिघी—उंबर्डा मार्गावर नियमित बससेवा सुरू झाली आहे.दररोज नियमित एसटी बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिघीपासून सोमठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी जयघोष करीत आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली बससेवा प्रत्यक्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.ही बससेवा केवळ वाहतुकीची सुविधा नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देणारी ठरणार आहे. नियमित आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाल्याने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती टिकवून ठेवण्यासही मदत होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.ही बससेवा सुरू करण्यासाठी डिस्ट्रिट एसटी ट्रॅफिक ऑफिसर भिवटे, कारंजा डेपो मॅनेजर चांदूरकर आणि वाहतूक निरीक्षक साखरकर यांनी विशेष सहकार्य केले. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव अमोल पाटणकर आणि आमदार सई डहाके यांच्या सहकार्यामुळे बससेवा सुरू होण्यास मोठी मदत झाली.
 
चालक-वाहकांचा सत्कार
बससेवा सुरू झाल्याच्या निमित्ताने सोमठाणा येथे एसटी बसचे चालक व वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी वाहक प्रमोद ठाकरे यांनी बसच्या वाहकाचा, तर हिंमतराव वाकोडे यांनी चालकाचा शाल, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर सोमठाणा येथून सुमारे १२ नागरिक एसटी बसने दिघी येथे गेले. दिघी येथून शाळकरी विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन बस सोमठाण्याकडे रवाना झाली.