चिखलीत 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचा जागर

पालिका प्रशासनाचा उपक्रम

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
चिखली (प्रतिनिधी):
swachhata-hi-seva-campaign  केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चिखली नगर परिषदेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत १ व २ ऑक्टोबर रोजी शहरात विविध जनजागृती उपक्रम आणि भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम चिखली शहराचे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उपनगराध्यक्ष, सभापती,नगरसेवक मुख्याधिकारी व नगर परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.
 
chikhali
या अभियानाची सुरुवात १ ऑक्टोबर रोजी 'एक तास श्रमदान' या विशेष मोहिमेने होणार आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मुख्य मार्गावर ही मोहीम राबविली जाईल. या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य रस्ता तसेच उद्यान परिसराची सामूहिक स्वच्छता करण्यात येणार आहे.
 
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरात स्वच्छतेचा संदेश देणारी भव्य 'स्वच्छता जनजागृती वाहन रॅली' काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, सकाळी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले जाईल. शहर सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प करत उपस्थितांना 'स्वच्छता व हरित शपथ' नगर पालिका कार्यालयात दिली जाणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून देशाच्या संरक्षणासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या चिखलीतील माजी सैनिकांचा कृतज्ञतापूर्वक 'सन्मान पत्र' देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
 
आपले शहर स्वच्छ, आरोग्यदायी आणि हरित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक चिखलीकराची नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छता ही एक लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमांमध्ये शहरातील सर्व व्यापारी बांधव, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन चिखली नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.