धर्म संस्कृती
प्रा. दिलीप जोशी
pitru-paksha हिंदू संस्कृती ही जगातील एकमेव संस्कृती आहे, ज्यात शाश्वत सिद्धांत आहेत. ज्ञान विज्ञान आहे. आपल्या संस्कृतीत मोक्ष, मुक्ती, पुनर्जन्म, चौऱ्यांशीचा फेरा, इहलोक, स्वर्ग, पाप-पुण्य, नैतिकता अशा बाबींचाही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचार केला आहे. पितृपक्ष आपल्या संस्कृतीचा श्रद्धेचा, निष्ठेचा, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचार आहे. खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्रासोबतच पिंड ब्रह्मांड, जिवाशिवाचा विचारही त्यात आहे. जिवंत असताना तर आई-वडील-गुरू यांची सेवा भारतीय माणूस करतोच; पण त्यांच्या मृत्युपश्चातही त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध, तर्पण, पिंडदानादी क्रिया हिंदू संस्कृतीत दृढ श्रद्धेने केल्या जातात.

आपल्या बापाला जिवंतपणी कैद करून पाणीही न देणाऱ्या औरंग्याला त्याच्या बापाने शहाजहांने आपल्या हिंदू संस्कृतीचे गुणगान करताना जिवंत बापाला पाणी न देणारी संस्कृती कुठे आणि मृत्यूनंतरही बापाला दरवर्षी पाणी जेवण घालणारी हिंदू संस्कृती कुठे! अशी स्तुती केली होती. आईवडील, सगेसोयरेच नाही तर प्राणिमात्रांची केवळ जिवंतपणीच सेवा नाही तर मेल्यावरही त्यांच्या मुक्तीसाठी धडपड हे फक्त इथेच भारतात आहे. भगवान श्रीरामांनी पक्षिराज जटायूचे पिंडदान श्राद्ध तर्पण, माउली ज्ञानेश्वरांनी आळे फाटा या गावी रेड्याचे पिंडदान श्राद्ध तर्पण केल्याचे सर्वश्रुत आहे. आपल्या धर्मात मृत्युपश्चातचाही विचार केला आहे. मृत्यूनंतरही सद्गतीसाठी इथे व्यवस्था आहेत. यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे पितृपक्ष.
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष. या १५ दिवसांना शास्त्रात ‘महालय’ म्हणतात. हा विशेष कालावधी असून तो अत्यंत पवित्र आहे. पितरांना सद्गती देणारा असून निषिद्ध अजिबात नाही. पितरांना मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, त्यांना सद्गती मिळावी, शांती मिळावी म्हणून पक्ष पंधरवड्यात पितरांचे आवाहन करून त्यांना पाचारण करतात. या पितृपक्षात ते भूलोकात आपल्या घरी येतात हा आपला विश्वास आहे. पिंडदान, श्राद्ध, तर्पण, क्षमादान, अर्घ्यदान, अग्नौकरण, विकीरदान, स्वधावाचन करून त्यांना भोजनाने तृप्त केले जाते. ते तृप्त होऊन उत्तमलोकात परत जातात. ही आपली नितांत श्रद्धा आहे.
पितृपक्षाचे एक खगोलशास्त्रीय कारण आहे. पृथ्वी ते चंद्र हे अंतर साधारणत: ३,८५,००० किमी आहे. पितृपक्षात हे अंतर कमी होऊन ३,८१,००० किमी होते. म्हणजे या कालावधीत चंद्र आपल्या जवळ आलेला असतो. चंद्र मनाचा कारक देव आहे. ‘चंद्रमा मनस: जात:’ असे म्हणतात. मन म्हणजे आपला सूक्ष्म देह. स्थूल देह मृत्यूनंतर पंचतत्वात विलीन होतो. सूक्ष्म देह म्हणजे मन पितरांच्या रूपात चंद्रावर स्थित असते. सोप्या शब्दात सांगायचे तर आपण आणि पितर यांच्यात कमी अंतर असलेला हा कालावधी असतो. सूक्ष्म देहाला मुक्ती देणारा आणि पृथ्वीच्या जवळ असणारा हा कालावधी. म्हणून खगोलीय महत्त्व या पितृपक्षात आहे.
पितृपक्षात दक्षिणायन असते. सूर्य कन्या राशीत असतो. या कालावधीत विधी करताना काळे तीळ, दर्भ यांचा वापर केला जातो. या दोन्हीत इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन, अनिष्ट लहरी शोषण्याचे सामर्थ्य असते. सोम म्हणजे चंद्र. सोम तांदळात अधिक असतो. त्यामुळे पिंड तांदळाचा असतो. गरुड पुराणानुसार तीळ भगवंताच्या घामातून तर दर्भ भगवंताच्या रोमातून निघाले आहे. त्यामुळे दर्भ, काळे तीळ आणि भाताचा वापर होतो. सोमत्व अर्थात चंद्रगुण अधिक होऊन पितरांना सुकर होते. याशिवाय या कालावधीत चंद्र दक्षिणेकडे म्हणजे यमाच्या दिशेने झुकलेला असतो. यम आद्य पितर आहेत. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष होय.
व्यक्ती मृत पावला की तो प्रैती म्हणजे प्रेत योनीत असतो. तो वर्षभर इथेच असतो. वर्षश्राद्ध झाल्याशिवाय एक वर्षपर्यंत तो जीव प्रेतयोनीतून पितृयोनीत जात नाही. म्हणूनच वर्षभर दर महिन्याला मासिक श्राद्ध सांगितले आहे. पितृपक्षाचे शास्त्र समजून घेतले पाहिजे. आपल्या शास्त्रात चार प्रकाराचे देह सांगितले आहेत. स्थूलदेह, सुक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारण देह. यातील स्थूल देह म्हणजे जो आपल्याला दिसतो; ज्याची आपण काळजी घेतो ते आपले शरीर. हा देह पंचमहाभूतांचा किंवा पंचतत्त्वांचा बनलेला असतो. माणूस मृत पावतो, त्याचा अंत्यसंस्कार केला जातो. म्हणजे हा स्थूल देह पंचतत्त्वात विलीन होतो. हा देह संपला तरी सुक्ष्म देह इथेच असतो. स्थूल देहाची अंत्यसंस्काराने सोय झाली, पण सुक्ष्म देहालाही अवयव असतात. श्राद्ध प्रयोगात त्या सर्व अवयवांचा उल्लेख असतो. विशेष म्हणजे हा सुक्ष्मदेह कावळ्याला दिसतो. पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात आणि साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणून पितृपक्षात सुक्ष्मदेहाकरिता श्राद्ध विधी आहे.
मनुष्य मृत झाला की तो मनुष्ययोनी सोडून प्रेतयोनीत जातो. स्थूल देहत्याग आणि सुक्ष्मदेह धारण हा पहिला टप्पा. ‘प्रेतलोक गमनार्थम्’ श्राद्धकर्म असते. या सुक्ष्मदेहाची तृप्ती झाली की हा देह पितृलोकात ज्याला शास्त्रात यमलोक म्हणतात तेथे जातो. हा कालावधी एक वर्षाचा असतो. वर्षश्राद्धानंतर सुक्ष्मदेहाची व्यवस्था होते. तेव्हा उरतो कारणदेह. कारणदेह पितृपक्षात आपल्याकडे येत असतो. हा कारणदेह तृप्त होतो तेव्हा त्यांना उत्तम लोक प्राप्त होतो.
त्यानंतर तृप्त होऊन कारणदेहाची व्यवस्था होते. आता उरला महाकारण देह. हा महाकारण देह पितृपक्षात पिंडदान आणि श्राद्ध यामुळे मुक्त होऊन तो उत्तम लोकांतून कैलासलोक, वैकुंठलोक ज्याला शास्त्रात मोक्ष, मुक्ती म्हणतात तिथे स्थिरावतो. यालाच सद्गती म्हणतात. भूलोकातून प्रेतलोकात, प्रेतलोकातून उत्तमलोकात आणि उत्तमलोकातून वैकुंठ अर्थात सद्गती. स्थूलदेह सुक्ष्मदेहात, सुक्ष्मदेह कारणदेहात, कारणदेह महाकारण देहात अन् शेवटी महाकारण देह नारायण स्वरूपात विलीन होतो. म्हणजे पिंड ब्रह्मांडात विलीन होते. असा हा प्रवास पिंडदानाने सुकर होतो. म्हणून पितृपक्ष महत्त्वाचा. पितृपक्षात पिंडदानातील पिंड हा भात, तीळ आणि मध किंवा तुपाचा बनवतात, त्याला चरूपिंड म्हणतात. श्राद्धादी प्रयोगात पिंड जर कणकेचा बनला असेल तर त्याला सत्तूपिंड म्हणतात. हे पिंड म्हणजे पितरांचे शरीर आहे. दर्भासनावर बसवून त्याचेच पूजन आपण करतो, पिंडाला नमस्कार करतो.
पिंडदान करताना तीन तीन पिंडांच्या तती मांडतात. पिता, पितामह आणि प्रपितामह म्हणजे वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्यासाठी ती असतात. तीन पिंडांची रांग ही प्रातिनिधिक असते. या क्रियेत आईकडील पूर्वज, सगेसोयरे यांचीही तृप्ती केली जाते. आपल्या गुरूंनाही तृप्त करण्याचा विधी यात आहे. इतकेच नाही, तर प्राणिमात्रांचे पिंडदान आपल्या संस्कृतीत आहे. पितृपक्षात पितरांना जेवू घालताना ते साक्षात यमलोकातून येतात अशी आपली श्रद्धा आणि विश्वास आहे. यमाला आद्यपितर म्हणतात. पितरांना जेवू घालताना देव आणि पितर यांची पाने असली तरी प्रत्यक्षात पिंडदान विधीत पिता म्हणजे अष्टवसू, पितामह हे एकादश रुद्र आणि प्रपितामह हे द्वादश आदित्य म्हणजे बारा सूर्य असतात. एका अर्थाने तेहतीस कोटी देवतांचीही ही तृप्ती आहे. हे वसू, रुद्र आणि आदित्य आपल्या पूर्वजांना मुक्तीसाठी सहाय्यभूत होतात. त्यांची तृप्ती आपल्या घरातील अवदसा आणि अवकळा घालवते. पितृपक्षात पितरांना तृप्त केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन घरात निरामय वातावरण निर्माण होते. पितृपक्षात गया, हरिद्वार, त्र्यंबक, बद्रिनाथ आणि उज्जैन क्षेत्री श्राद्ध, तर्पण, पिंडदान फलदायी असते. याशिवाय ब्रह्मकपाल येथे जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध स्वतः करण्याची परंपरा आहे. स्वश्राद्ध इतर स्थानीही करता येते. या सर्व तीर्थात गया क्षेत्र अग्रस्थानी आहे.
‘श्राद्धारंभे गयायां ध्यात्वा, ध्यात्वा देव गदाधरं’
भाद्रपदातील पौर्णिमा आणि कृष्णपक्ष मिळून सोळा दिवस होतात. हा महालय म्हणून प्रसिद्ध आहे. महालय म्हणजे या दिवशी सर्व पितरांना एकत्रितपणे आवाहन केले जाते. महा मोठा अल्लय म्हणजे एकत्रित येणे. पितृपक्षात पितरांना अन्न आणि अक्षय्यतृतीयेला घडाभरून पाणी दिल्यास त्यांना सद्गती तर मिळतेच; पण आपल्याही जीवनात सुख-शांती-समाधान कायम निवासी राहते. पितृपक्ष हा पितरांना सद्गती देणारा पवित्र पंधरवडा आहे. अतीव विश्वासाने भारतात श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. ते निश्चित फलदायी आहे. पितृपक्ष ही पुण्य कमावण्याची सर्वात मोठी संधी आहे.
९८२२२६२७३५