‘सगळ्यांनी एकत्र मैदानात उतरले पाहिजे’

उद्धव ठाकरेंचा INDIA आघाडीत सूर

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
uddhav-thackeray मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह एसआयआरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना बुधवारी दिल्लीत INDIA आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना यूबीटीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून स्वतंत्रपणे आंदोलन करण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, विरोधकांनी एकत्रितपणे आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली.उद्धव ठाकरे यांनी INDIA आघाडीच्या बॅनरखाली सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारावे, अशी भूमिका मांडली. प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे कार्यक्रम घेण्याऐवजी आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्यास आंदोलन अधिक प्रभावी ठरेल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वतंत्रपणे सुरू असलेल्या धरना-प्रदर्शनाचाही त्यांनी संदर्भ दिला.
 
uddhav-thackeray
 
याआधी काँग्रेसने एसआयआरशी संबंधित मुद्दे समोर आल्यानंतर आपल्या राज्यातील संघटनांना आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर विविध राज्यांमध्ये काँग्रेसकडून आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेकडून निवडणूक आयोगाविरोधात मोठे आंदोलन होणार असल्याची माहिती बैठकीत दिली.निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधातील आंदोलन INDIA आघाडीने एकत्रितपणे केल्यास त्याचा परिणाम अधिक व्यापक होईल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्यामुळे पुढील काळात आघाडीच्या माध्यमातून संयुक्त आंदोलनाची रणनीती आखण्यावर बैठकीत चर्चा झाली.
 
दरम्यान, दिल्लीतील बैठकीत निवडणूक आयोग आणि एसआयआर हे प्रमुख मुद्दे ठरले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक प्रक्रियेतील बदलांबाबत विविध मागण्या विरोधी पक्षांसमोर मांडल्या. एसआयआरची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अस्तित्वात असलेली मतदार यादी भविष्यातील निवडणुकांसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणीही खरगे यांनी केली.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणीही मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत केली. निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात समोर आलेल्या कथित अंतर्गत आक्षेपांचा दाखला देत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
 
खरगे यांनी ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा खरगे यांनी केला. या आक्षेपांमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजासह त्याच्या निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.