दुबई,
virat-kohli भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाची झेप घेत थेट दुसरे स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतक झळकावल्याचा फायदा कोहलीला ताज्या क्रमवारीत झाला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल अजूनही अव्वल स्थानावर असला तरी त्याचे आणि कोहलीचे रेटिंगमधील अंतर आता कमी झाले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिलने १०८ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. या कामगिरीनंतर त्याचे रेटिंग ८१६ झाले आहे. २०२३ मध्ये गिलचे सर्वोच्च रेटिंग ८४१ होते. त्यामुळे सध्याच्या क्रमवारीत तो त्या आकड्याच्या जवळ पोहोचला आहे. मात्र, कोहलीच्या कामगिरीमुळे अव्वल स्थानासाठीची चुरस वाढली आहे.
विराट कोहलीने पहिल्या सामन्यात ८८ चेंडूंमध्ये नाबाद १३९ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने या खेळीत १० चौकार आणि ९ षटकार लगावले. या कामगिरीमुळे त्याचे रेटिंग ७९६ झाले असून, तो एका स्थानाने वर गेला आहे. कोहलीच्या झेपेमुळे न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल एका स्थानाने घसरून ७९४ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
रोहित शर्मा एकदिवसीय क्रमवारीत ७५३ रेटिंगसह चौथ्या स्थानावर कायम आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ३५ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. दरम्यान, श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने तीन स्थानांची झेप घेत सातवे स्थान मिळवले असून त्याचे रेटिंग ६७४ आहे.