गणेश विसर्जनाच्या खर्चावर नगरसेविकेचा सवाल

६ लाखांच्या डोमसह सजावट, होर्डिंगच्या खर्चावर आक्षेप; टेंडर प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नागपूर
visarjan-expenses गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या खर्चावर भाजपच्या नगरसेविका संतोष लड्डा यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. कच्छी विसा मैदान आणि सरदार वल्लभभाई पटेल मैदान येथे विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेतील विविध खर्चाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित खर्चाचा स्पष्ट हिशोब आणि स्पष्टीकरण मागितले आहे.
 
visarjan
महानगरपालिकेच्या कागदपत्रांनुसार, विसर्जनस्थळी सुमारे ६ लाख ६ हजार रुपयांचा डोम उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर डोमच्या सजावटीसाठी तब्बल १ लाख १० हजार रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा नगरसेविका लड्डा यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेल्या डोमची नेमकी आवश्यकता काय होती आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग किती झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
याशिवाय जाहिरात आणि होर्डिंगसाठी ५७ हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचे लड्डा यांनी म्हटले आहे. या होर्डिंगवर प्रोटोकॉलनुसार प्रमुख लोकप्रतिनिधींची छायाचित्रे का लावण्यात आली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे.
 
विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशीची तारीख आधीपासून निश्चित असतानाही विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी टेंडर प्रक्रिया ऐनवेळी का राबवण्यात आली? अशी विचारणा त्यांनी केली आहे. नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध असताना प्रक्रिया उशिरा राबविण्याचे कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
गणेश विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेवरील खर्चाची पारदर्शकता, कामांची आवश्यकता आणि टेंडर प्रक्रियेबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेविका संतोष लड्डा यांनी केली आहे. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन या आक्षेपांवर काय स्पष्टीकरण देते, याकडे लक्ष लागले आहे.