रहदारीचा बोजवारा
वाशीम,
washim-news गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अकोला नाका ते काटा चौफुली या महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. मात्र, रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने वाहनधारक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याचे एका बाजूने खोदकाम करून वाहतूक एकाच बाजूने सुरू ठेवण्यात आल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून, अपघाताची शयताही निर्माण झाली आहे.

अकोला नाका ते काटा चौफुली हा वाशीम शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन विभाग यासह विविध शासकीय कार्यालये आहेत. तसेच नवोदय विद्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय आणि अन्य शैक्षणिक संस्था या परिसरात असल्याने विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. याशिवाय काटा, कोंडाळा, सुरळा, तोरणाळा, कार्ली, एरंडा, मैराळडोह, किन्हीराजा यासह परिसरातील अनेक गावाकडे जाण्यासाठी शहरातून जाणारा हाच प्रमुख मार्ग असल्याने दररोज हजारो वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. रस्त्याच्या कामास सुरुवात करताना प्रथम एका बाजूला नालीचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्या एका बाजूचे खोदकाम करण्यात आले. मात्र, त्यानंतर अपेक्षित वेगाने पुढील काम होत नसल्याने खोदलेला रस्ता आणि अपूर्ण बांधकाम वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. एकीकडे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे, तर दुसरीकडे खोदकामामुळे रस्त्यावर धूळ, खड्डे आणि चढ-उतार निर्माण झाले आहेत. परिणामी दुचाकीस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनधारक तसेच पादचार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता अरुंद झाल्याने समोरासमोर येणार्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यातच मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असल्याने किरकोळ अपघाताची शयता वाढली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना, दिशादर्शक फलक आणि आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्ता तयार झाल्यानंतर काही वर्षांतच त्याची अवस्था खराब होऊ नये, यासाठी बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण आवश्यक आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामाकडे पाहता काम घाईघाईने आणि थातूरमातूर पद्धतीने केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याची संबंधित तांत्रिक अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे. रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची आहे. मात्र, कामाच्या संथगती बरोबरच दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत असताना संबंधित अधिकारी नेमकी कोणती कार्यवाही करीत आहेत, असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. कामाच्या ठिकाणी नियमित पाहणी करून कंत्राटदार कंपनीला आवश्यक त्या सूचना देणे, काम निविदेतील अटी व तांत्रिक निकषांनुसार करून घेणे आणि कामाची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. शासकीय कार्यालयांमध्ये येणारे नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी तसेच ग्रामीण भागातून वाशीम शहरात येणारे नागरिक याच मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रस्त्याचे काम आणखी लांबल्यास नागरिकांची गैरसोय वाढण्याची शयता आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीने कामाला गती देऊन वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे. रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. संबंधित विभागाने कंत्राटदार कंपनीवर प्रभावी नियंत्रण ठेवून या कामात कर्तव्यनिष्ठतेचा परिचय द्यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.