भयानक...नेपाळच्या पुरात ६०० मुले बेपत्ता!

दहाव्या दिवशीही शोधमोहीम सुरू

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
काठमांडू,
600 children missing in Nepal floods ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या आपत्तीला दहावा दिवस उलटला असला, तरी बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे. नेपाळच्या लष्कराचे जवान दिवस-रात्र ढिगारे हटवत बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. रसुवा ते नुवाकोटपर्यंत विविध भागांमध्ये बचाव पथकांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. या दरम्यान समोर आलेली माहिती अत्यंत चिंताजनक असून, पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट परिसरातील जवळपास ६०० मुले बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांकडून संकलित करण्यात आलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यात सुमारे २८० मुले बेपत्ता आहेत. नुवाकोटमध्ये ही संख्या अंदाजे ३०० ते ३५० इतकी आहे. काही बेपत्ता विद्यार्थी सापडले असले, तरी नुवाकोटमध्ये अद्याप किमान ३०० विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याशिवाय रसुवातील १६ आणि नुवाकोटमधील ६ शिक्षकही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.
 
 

600 children missing in Nepal floods 
 
नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रसुवा, नुवाकोट आणि धादिंग या भागांतील २२ शाळांना पुराचा फटका बसला आहे. त्यापैकी १२ शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे या आपत्तीचा विद्यार्थ्यांसह शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे.या विनाशकारी पुरात आतापर्यंत १,२८२ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ५,००० बेपत्ता नागरिकांचा शोध अद्याप सुरू आहे. आपत्तीनंतर १२,००० हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. मात्र, जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांचा शोध घेणे लष्करासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. या कामगारांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल आणि ढिगारा साचल्याने जवानांकडून तो हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बचावकार्याच्या दहाव्या दिवशी शुक्रवारी एक आशादायक घटना घडली. त्रिशुली पॉवर प्रोजेक्टच्या बोगद्यात अडकलेल्या एका कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मोठ्या प्रमाणात चिखल आणि ढिगारा साचलेल्या या बोगद्यातून कामगाराला बाहेर काढण्यात आल्याने बचाव पथकांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. अजूनही बोगद्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लष्करी जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.