अनिल कांबळे
नागपूर,
action by yashodharanagar police वर्गमित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला कुटुंबीयांना न सांगता गेलेल्या यशोधरानगर परिसरातील दोन १३ वर्षीय मुलींना पोलिसांनी काही तासांत सुखरूप शोधून काढले. दोन्ही मुली जरीपटक्यात आढळून आल्या. त्यानंतर आवश्यक पडताळणी आणि समुपदेशन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. विनोबा भावेनगरात राहणारी ३५ वर्षीय महिला खासगी नोकरी करते. १ सप्टेंबर रोजी कामानिमित्त ती उमरेड येथे गेली होती. रात्री ८ वाजता घरी परतल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी प्रिया (१३) घरात दिसली नाही.

हिंदी शाळेत इयत्ता सातवीत शिकणारी प्रिया मागील चार दिवसांपासून शाळेतही गेली नव्हती. प्रिया हिचा शोध घेत असताना तिची मैत्रीण लक्ष्मी (१३), रा. गांधी चौक, संतोषीनगर, हीदेखील सकाळी ८ वाजता घराबाहेर पडल्याची आणि त्यानंतर परतली नसल्याची माहिती मिळाली. लक्ष्मी याच परिसरात भाड्याने राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मुली बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यानंतर यशोधरानगर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक तपासासह मानवी माहितीच्या आधारे मुलींचा शोध सुरू केला.
काही तासांतच मुलीचा शोध
पोलिस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काही तासांतच दोन्ही मुलींना जरीपटक्यात शोधून काढले. चौकशीत त्या एका वर्गमित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना न सांगता जरीपटक्यात गेल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही मुलींना सुरक्षितपणे यशोधरानगर पोलिस ठाण्यात आणले. आवश्यक पडताळणी आणि समुपदेशनानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तपासादरम्यान मुलींविरुद्ध कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे