खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : डॉ. नीलम गोऱ्हे

अमरावती हत्या प्रकरणाची दखल

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
अमरावती
amravati-murder-case येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी आहे. मुलींना धमकावणे, त्यांचा पाठलाग करणे आणि नकार दिल्यानंतर त्यांची हत्या करणे ही गंभीर सामाजिक विकृती असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

neelam 
 
अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्याशी सविस्तर चर्चा करून तपासाची माहिती घेतल्यावर त्यांनी उपरोक्त प्रतिक्रीया दिली. पीडित मुलीला एका परिचित व्यक्तीकडून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे अमरावतीसह राज्यभरात तीव्र जनक्षोभ निर्माण झाला आहे. केमिकल ॲनालिसिस आणि शवविच्छेदन अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे, न्यायालयीन जबाब तसेच मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्यात यावे. कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेत आरोपीला फाशीची शिक्षा होईल इतका भक्कम खटला उभा करावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्तांना केली.
 
नसरापूर प्रकरणाच्या धर्तीवर या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि शक्य तितक्या कमी कालावधीत निकाल लागण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मुलींची छेडछाड करणारे, त्यांचा पाठलाग करणारे अथवा त्यांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून धमकावणारे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी मुलींमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अशा तक्रारींची गोपनीय आणि तातडीने दखल घेऊन संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अमरावती पोलिसांनी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना केली आहे.