धाराशिव,
Ashwini Paul jumps from Naldurg fort राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कुस्तीच्या मैदानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अश्विनी मनोहर पौळ यांच्याबाबत नळदुर्ग किल्ल्यावर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ३ सप्टेंबर २०२६ रोजी अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्याच्या १०० फूट उंच बुरुजावरून उडी घेतली. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर तिच्यावर उपचार सुरू आहेत. अश्विनी तानाजी मोहिते या विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ झाल्या. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या त्या रहिवासी होत्या. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केल्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके मिळवली होती.

अश्विनी यांना कुस्तीचे प्रशिक्षण घरातूनच मिळाले. त्यांच्या कुटुंबात वडील, भाऊ, आई आणि बहीण हे सर्व कुस्तीशी जोडलेले होते. त्यांचे पती मनोहर पौळ हे देखील कुस्तीपटू आहेत. वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी मुलीच्या सरावासाठी घरातच तालीम सुरू केली होती. याच वातावरणातून अश्विनी यांनी कुस्तीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २००७ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अश्विनी यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २००८ मध्ये गुरुदासपूर आणि २००९ मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सुवर्णपदक मिळवले. २०१० मध्ये भोपाल, कानपूर आणि हरियाणा, तसेच बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली. त्यांच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई केली.
क्रीडा क्षेत्रासोबतच अश्विनी मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) नोकरी करत होत्या. मात्र, पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी घटनेच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नळदुर्ग किल्ल्यावरील या घटनेने अश्विनी पौळ यांच्या क्रीडा कारकिर्दीचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कुस्तीच्या मैदानात ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदके मिळवत ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूचा अंत अत्यंत दुर्दैवी ठरला आहे.