वर्धा,
Ban on laser lights in Wardha आगामी दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईट्सवर जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदर आदेश ४ सप्टेंबर २०२६ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात लागू राहतील.
डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका
सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हाय-पॉवर लेझर लाईट्स आणि लेझर बीमचा वापर केला जातो. हा तीव्र प्रकाश मानवी डोळ्यांसाठी अत्यंत घातक असून, यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या डोळ्यांच्या पडद्यावर (Retina) तसेच बुबुळावर (Cornea) गंभीर स्वरूपाची इजा होण्याची शक्यता असते. पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडून प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
कलम १६३ अन्वये कारवाईचा इशारा
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (BNSS) च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश दिले आहेत. या कालावधीत लेझर लाईट, हाय पॉवर लेझर बीम अथवा कोणत्याही प्रकारच्या लेझर शो च्या वापरावर सक्त निर्बंध असतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधित विभागांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.