कोलकाता,
bcci bans 64 cricketers वयाची चुकीची माहिती दिल्याच्या प्रकरणांवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कठोर पाऊल उचलले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीत जन्मतारखांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्याने तब्बल ६४ खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईत २०२२ च्या भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य रवी कुमारचाही समावेश आहे.
या प्रकरणात लेग-स्पिनर रोहित यादवचे नाव विशेष चर्चेत आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी रोहितची भारतीय १९ वर्षांखालील संघात निवड झाली होती. मात्र, कागदपत्रांच्या तपासणीत त्याच्या वयामध्ये २७ महिन्यांची तफावत आढळली. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले असून, बीसीसीआयने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. ही कारवाई तत्काळ लागू करण्यात आली असून, बीसीसीआयशी संलग्न सर्व राज्य क्रिकेट संघटनांना त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पीटीआयच्या माहितीनुसार, वयातील विसंगतीमुळे कारवाई झालेल्या खेळाडूंमध्ये रवी कुमार आणि डावखुरा फिरकी गोलंदाज-अष्टपैलू विशाल भट्टी यांचाही समावेश आहे. २०२२ मध्ये भारताने जिंकलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघाचा रवी कुमार महत्त्वाचा सदस्य होता. सीएबीच्या नोंदी तपासल्यानंतर त्याच्या वयामध्ये ४५ महिन्यांची तफावत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय इतर अनेक वयोगटातील खेळाडूंच्या कागदपत्रांमध्येही विसंगती आढळून आली आहे.
वयोगटातील क्रिकेटमध्ये वयाची योग्य नोंद राहावी यासाठी कागदपत्रांची सविस्तर छाननी करण्यात आली. १९ वर्षांखालील क्रिकेटच्या वय पडताळणी प्रक्रियेत खेळाडूंना जन्म प्रमाणपत्रासोबत शाळा आणि महाविद्यालयातील शैक्षणिक नोंदीशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. सीएबीने तपासणीनंतर कारवाई करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे.