नवी दिल्ली,
brics-judges-forum-delhiब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीत ब्रिक्स सरन्यायाधीश मंचाचे आयोजन करणार आहे. हा मंच ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान आयोजित केला जाईल़ सरन्यायाधीश सूर्य कांत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील न्यायिक नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. १८ वी ब्रिक्स शिखर परिषद १२-१३ सप्टेंबर रोजी होत आहे.
भारतात आयोजित या तीन दिवसीय सरन्यायाधीश मंचाला ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आज न्यायव्यवस्थेसमोरील आव्हाने हा चर्चेचा मुख्य अजेंडा असेल. लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्य कांत या मंचावर १० देशांतील न्यायिक नेत्यांना भेटणार आहेत. पहिल्या दिवशी, ४ सप्टेंबरला सरन्यायाधीश सूर्य कांत रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, बेलारूस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान या देशांच्या न्यायिक प्रतिनिधी मंडळांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
ब्रिक्स देशांचे न्यायिक प्रतिनिधी मांडतील त्यांच्या अडचणी
दुसऱ्या दिवशी, ५ सप्टेंबरला प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख न्यायिक संस्थांसंबंधीच्या सामायिक चिंतांवर प्रकाश टाकत मंचाला संबोधित करतील.
ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तान यासारख्या भागीदार देशांचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील.
विविध विषयांवर हाेणार चर्चा
सरन्यायाधीश मंच ब्रिक्स देशांतील न्यायिक नेत्यांना न्यायदान, आंतरराष्ट्रीय विवाद निराकरण आणि तांत्रिक विकास या विषयांवर आपले दृष्टिकोन मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतील. याव्यतिरिक्त, सीमापार क्षेत्रांमध्ये लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी, न्यायव्यवस्थेत एआयचा वापर आणि न्यायिक नेतृत्वाचा निरंतर विकास यासारख्या विषयांवरही चर्चा केली जाईल.