५०४ कोटींच्या घोटाळ्यात १९ आरोपींविरोधात आरोपपत्र

सहा आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cbi-504-crore-scamराज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि कार्यालयात ५०४ कोटी रुपयांच्या निधीचा कथित अपहार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने सहा आयएएस अधिकाऱ्यांसह १९ जणांविरोधात न्यायालयात आरोपत्र सादर केले. याशिवाय आरोपींमध्ये आयडीएफसी बँकेचे तीन आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
 
सीबीआयने या प्रकरणी पंचकुलाच्या विशेष न्यायालयात सादर केलेल्या तिसऱ्या आरोपपत्रात आयएएस अधिकारी राम कुमार सिंग, मोहम्मद शाहीन, प्रदीप कुमार, साकेत कुमार, विनीत गर्ग आणि पंकज अग्रवाल यांची नावे आहेत. आरोपींवर गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावा नष्ट करणे, बनावटगिरी, बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे, हिशेबात फेरफार करणे, विश्वासघात आणि गुन्ह्यात मदत करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपपत्रात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरी आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
 

cbi 
काय आहे प्रकरण ?
सरकारी कर्मचाऱ्यांनी, बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून हरयाणा सरकारच्या आठ विभागांचा निधी विविध अधिकृत बँकांमधून आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या विशिष्ट शाखांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. निधीचा अपहार करण्यासाठी या बँक शाखांमध्ये बँक खातीही उघडण्यात आली. सरकारी निधीच्या अपहाराच्या या प्रक्रियेत हरयाणा सरकारच्या वित्त विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. या खात्यांमार्फत विविध फसव्या मार्गांनी निधी काढून घेण्यात आला आणि सरकारी विभागाशी कोणताही संबंध नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
आठ विभागांत घोटाळा
 
पंचकुला पंचायत विभाग, कालका महानगरपालिका, शालेय शिक्षण प्रकल्प परिषद, कामगार कल्याण मंडळ,राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कृषी विपणन मंडळ आणि पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यासह आठ राज्य सरकारी विभाग आणि संस्थांच्या कामकाजावर लक्षणीय परिणाम झाला. या फसवणुकीची एकूण रक्कम ५०४ कोटी आहे.