वाशीम,
orange orchards जिल्ह्यातील मुंगळा, वनोजा, मानोरा यासह विविध संत्रा उत्पादक भागात पावसाच्या अनियमिततेचा बागांवर परिणाम झाला आहे. पावसाने दीर्घ दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, त्याचा झाडांच्या वाढीसह फुलोरा व फळधारणेवर परिणाम झाला आहे. काही बागांमध्ये यंदा फळधारणेत ४० ते ५० टक्कयांपर्यंत घट झाल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
संत्रा बागेत फुलोर्यापासून फळधारणेपर्यंत जमिनीतील पुरेसा ओलावा आणि पोषक हवामान आवश्यक असते. यंदा पावसाचा खंड पडल्याने झाडांवर ताण निर्माण झाला. परिणामी अपेक्षित प्रमाणात फुलोरा आणि फळधारणा झालेली नाही. लागलेल्या फळांचा आकार आणि दर्जाही प्रभावित होण्याची शक्यता असल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे.
उत्पादन कमालीची घटण्याची शक्यता
संत्रा बागांच्या देखभालीसाठी खत, औषध फवारणी, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च होतो. फळधारणा कमी झाल्यास उत्पादन घटून खर्चाच्या तुलनेत उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बागा जगविण्याची अतोनात धडपड
पावसाने ओढ दिल्याने मुंगळा, वनोजा व मानोरा परिसरातील काही शेतकर्यांनी संत्रा बागांना ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विहीर व बोअरवेलमधील मर्यादित पाणीसाठ्यामुळे आगामी काळात सिंचनासाठी पाणी पुरणार का, याची चिंता उत्पादकांना सतावत आहे.