मंगरूळनाथ,
declare a dry drought तालुक्यातील कोठारी व परिसरात मागील २५ ते ३० दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दांडी मारल्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके डोळ्यांसमोर सुकत असल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, या भागात तात्काळ ’कोरडा दुष्काळ’ जाहीर करून पिकांचे पंचनामे करावे व बाधित शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कोठारी येथील शेतकर्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील महिनाभरापासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे शेतातील पिके सुकत आहेत. पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून शेतकर्यांच्या डोळ्यांत अश्रू येत असून शेतकरी हताश व निराश झाला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांची आर्थिक बाजू पावसाच्या खंडामुळे अधिकच कमकुवत झाली असून, त्यांच्यासमोर जीवन जगणे कठीण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महसूल प्रशासनाने परिसरातील पिकांचे तात्काळ पंचनामे करावे आणि पीडित शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर विलास रंदाळे, आनंदा राठोड, चंद्रकांत विश्वनाथ तोंडारे, बाळू महाजनकार, सुनील माहुलकर, सुशील रंदाळे, रमेश राठोड, बापूराव डहाके, शेख शाहरूख, शे. जाफर, भाऊ पवार अतुल मिरकले, मनोज देशमुख, विठ्ठल पवार यांच्यासह इतर शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.