नागपूर,
nagpur zilla parishad निवृत्तीवेतन वितरण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करत नागपूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात प्रथमच कोषागारातून थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात निवृत्तीवेतन जमा करण्याची प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली आहे. यापूर्वी कोषागार, वित्त विभाग आणि पंचायत समितीमार्फत निवृत्तीवेतन खात्यावर जमा होत असल्याने ५ ते ६ दिवसांचा विलंब होत असे. त्यामुळे पेन्शनधारकांना अनेकदा महिन्याच्या ३ किंवा ४ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती.
ही अडचण दूर करण्यासाठी ग्रामविकास विभाग व महाआयटीच्या निवृत्तीवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिले. अवघ्या दोन-तीन महिन्यांत सुमारे ४,६०० पेन्शनधारकांची माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली.
दिलेला शब्द पाळला; २ सप्टेंबरलाच पेन्शन खात्यात!
या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ऑगस्ट महिन्याचे निवृत्तीवेतन २ सप्टेंबर रोजी थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. सर्व पंचायत समित्यांमधील पेन्शनधारकांना एकाच वेळी वेळेत निवृत्तीवेतन देणारी नागपूर जिल्हा परिषद महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. दर महिन्याच्या २ तारखेलाच निवृत्तीवेतन हा दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरला असून, नव्या प्रणालीमुळे निवृत्तीवेतन वितरण अधिक जलद, पारदर्शक आणि अचूक होणार आहे.
निवृत्तीवेतन हा निवृत्त कर्मचार्यांचा हक्क आहे. तो वेळेत आणि सन्मानाने मिळावा, यासाठी ही व्यवस्था सुरू करण्यात आली. ‘दर महिन्याच्या २ तारखेलाच निवृत्तीवेतन’ हा दिलेला शब्द आज प्रत्यक्षात उतरला आहे.
- विनायक महामुनी