पारबती... पारबती!

पारबती... पारबती!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
वेध
 
रेवती जोशी-अंधारे


Hanuman Ansh' movie and Gen Z जेन-झी सोबत संवाद साधण्यासाठी सध्या विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. या संवादासोबतच त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि एक जबाबदार पिढी घडावी, यासाठीही विचारमंथन सुरू आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतही बरीच धामधूम सुरू आहे. कमी बजेटचे पण जास्त कमाई करणारे, देशप्रेमाने भारलेले, अध्यात्माला मोठ्या पडद्यावर आणणारे चित्रपट जेन-झीच्या प्रेक्षकांना मल्टिप्लेक्सेसकडे खेचत आहेत. ‘हनुमान अंश’ नावाच्या लो बजेट चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रम स्थापित केले आहेत. पण, त्यातील एका गाण्याला युवा पिढीने उचलून धरलंय. अवघ्या दोन आठवड्यांत या गाण्याला 5 मिलियन लोकांनी पाहिलं-ऐकलं. त्यापेक्षा जास्त लोकांनी हे गाणं डाऊनलोड केलं. लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठत असलेल्या या गाण्याचा वेध घेऊया!
 
 
hanumans
 
 
ही पिढी पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारी नाही. प्रत्येक गोष्ट स्वत:च्या कसोटीवर तपासून बघणार्‍या या पिढीला सगळं ऑथेंटिक, स्थेटिक आवडतं. मग ते सिनेमे असतील, कपडे किंवा संगीत! लोकगीतं, एतद्देशीय वाद्यं, थेट बोलीभाषांमधील गाणी त्यांना लगेच अपील करतात. याचाच परिपाक म्हणजे पारबती...पारबती हे गाणं! सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि महादेव-पार्वती यांच्या विविध रूपांचे गुणगानही! बुंदेलखंडी हिंदीतील हे एक भजन आहे. मंत्रमुग्ध करणारी खास लोकगीताची लय, सोपे शब्द आणि एखाद्या गावात संध्याकाळी मंदिरातील आरतीत वाजणारी वाद्यं ही या गाण्याची विशेषता म्हणावी लागेल. साधू तिवारीने लिहिलेल्या, गायिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गीत-भजनाने लोकांच्या विशेषत: नव्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये जागा पटकावली आहे.
 
 
 
‘हनुमान अंश’ हा चित्रपट निम करौली बाबांच्या जीवनावर आधारित असून, त्यातील विवाहप्रसंगी हे गीत-भजन आहे. महादेवाला वरण्यासाठी उपवास करून, घोर तपस्या करणार्‍या पार्वतीची गोष्ट या गाण्यात आहे. तिचे तप आणि हट्ट बघून सप्तर्षी मिळून तिला समजावतात. महादेवाशी विवाहाचा हट्ट सोडून दे, तप-उपवास सोडून दे असे विनवतात. तिला महादेवाशी विवाह न करण्यासाठी अनेक तर्क देतात, असे सगळे वर्णन या गाण्यात आहे. ‘काहे जिद कर रही, काहे को मर रही...’ असे म्हणून सप्तर्षी पार्वतीला महादेवाला वरण्यापासून परावृत्त करतात. बुंदेलखंड म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भाग! बुंदेली हिंदीवर दोन्ही प्रांतांतील बोलींचा प्रभाव असल्यामुळे वेगळाच गोडवा असलेली ही भाषा आहे. बुंदेली विवाहगीतं हा एक समृद्ध मौखिक वारसा आहे. समारंभांमध्ये बहार आणणार्‍या या गाण्यांमध्ये दैनंदिन जीवनातील खेळकरपणा आणि थट्टामस्करीचा छान मिलाफ असतो. बुंदेली विवाहगीतांचा पायाच शिव-पार्वती असून या गीतांमध्ये त्यांना मंदिराच्या गाभार्‍यातून थेट घराच्या अंगणात आणले जाते. महादेव म्हणजे अवलिया, अंगाला भस्मलेप, नंदीवर बसून आणि विचित्र वरात घेऊन आलेला वर बघून, विवाहाचा पुनर्विचार कर, अशी पार्वतीची म्हणजे वधूची थट्टा केली जाते.
 
 
 
बुंदेली विवाहगीतांचे दादरे-सोहरे (सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद देणारी) बन्ना-बन्नी (वर-वधू पक्षाची खिल्ली उडविणारी) आणि गारी असे प्रकार आहेत. यापैकी गारी गीतांमध्ये, सामाजिक नियमांना छेद देऊन हलकीफुलकी बंडखोरी केली जाते. पारबती... हे या प्रकारात मोडणारे गीत-भजन आहे. या गाण्यांची शब्दरचना जशी सोपी तशीच त्यांच्यासोबत वाजणारी वाद्यंही सुटसुटीत! डफली, खंजेरी, नगडीया ही तालवाद्ये आणि चिकारा-एकतार्‍यासारखी तंतुवाद्ये या गीतांना खणखणीत नादमय बनवितात. एकूणच सामाजिक स्थिती बघता, सामान्य कुटुंबातील मुलींचे विवाह हा चिंतेचा विषय! त्यात, सोहळा पार पडण्याची काळजी वगैरे दूर करून काही क्षण गमतीत रमविणारी ही बुंदेली विवाहगीतं! साधू तिवारीने या गीतांचा, वाद्यांचा अचूक वापर करून ‘पारबती...पारबती’ला जेन- झीच्या स्मार्टफोनमध्ये उतरवलं आहे. हे गीत-भजन अगदी ग्रामीण वातावरणात चित्रित केल्याचं जाणवतं. वाद्यांचा गोंगाट नाही तसे भडक अंगविक्षेपही नाहीत. पण, गीताचे बोल आणि वाद्यांचा ठेका मात्र मोहक! इतका की हे गीत-भजन लूपमध्ये टाकून ऐकावं. आपण आपली संस्कृती, भाषा, संगीत-वाद्यांची अशी नव्याने ओळख झाली तर जेन-झी सोबतच पुढच्या अल्फा आणि बीटा पिढ्यांनाही हा समृद्ध वारसा आपोआप मिळेल. सुदींग म्युझिकच्या नावाखाली एआय निर्मित संगीत ऐकण्यापेक्षा लोकगीतांची भुरळ नव्या पिढ्यांना पडावी. भजन क्लबिंगच्या ट्रेंडने याची सुरुवात झाली आहेच. आपलं तेच सोनं हा विश्‍वास युवा पिढीत निर्माण झाला की, मैदान फत्ते!