नागपूर,
supriya sule महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने नागपूर व अमरावती विभागातील शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त अधिवेशन रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे सहकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार अभिजित वंजारी, तर कार्याध्यक्षपदी महामंडळाचे माजी केंद्रीय मंत्री विजयनवल पाटील आहेत. शिक्षक आमदार सुधाकर अडबले, शिक्षक आमदार किरण सरनाईक, आमदार संजय भेंडे, आमदार धीरज लिंगाडे तसेच महामंडळाचे सहकार्यवाह रवींद्र फडणवीस, विजय गव्हाणे, नागपूर विभागाचे अध्यक्ष अनिल शिंदे, अमरावती विभागाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. नागपूर व अमरावती विभागातील शिक्षण संस्थांचे संचालक मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता एमकेसीएलचे संचालक शशिकांत देशपांडे यांचा एआय वर परिसंवाद होणार असून दुपारी २ वाजता किरण भगत व रवींद्र कापसे यांचे सत्र होईल. खुल्या सत्रानंतर दुपारी ४ वाजता अधिवेशनाचा समारोप हाईल.
शालेय व उच्चशिक्षण क्षेत्रासंदर्भात शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध निर्णयांमुळे शिक्षण संस्थांच्या आर्थिक व प्रशासकीय अडचणी वाढत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने शिक्षण व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत असून, शिक्षण क्षेत्रासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः शून्य शिक्षकी शाळांची वाढती संख्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये होणारी घट आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम या मुद्द्यांवर अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी शिक्षकांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे ग्रामीण शिक्षणाचा पाया कमकुवत होत आहे. या आणि अशा अनेक विषयांवर अधिवेशनात विचारमंथन होणार आहे. या अधिवेशनाला संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाच्या कार्यकारिणीने केले आहे. पत्रपरिषदेला नागपूर विभागीय सचिव किशोर मासुरकर, महेश चामट, कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांची उपस्थिती होती.