नवी दिल्ली,
indias historic t20 match against japan भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी भारत-जपान यांच्यातील ऐतिहासिक टी-२० सामन्याची घोषणा केली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या मोहिमेपूर्वी हा सामना खेळवण्यात येणार असून, २२ सप्टेंबर २०२६ रोजी दोन्ही देशांचे पुरुष क्रिकेट संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सामना २८ सप्टेंबरला होणार आहे.
भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा विशेष सामना आयोजित करण्यात आला आहे. जपानच्या तोचिगी प्रांतातील सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर २२ सप्टेंबर रोजी सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
‘स्पोर्ट ७५’ या नव्या उपक्रमांतर्गत हा सामना आयोजित केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या भेटीदरम्यान या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. क्रीडा माध्यमातून भारत-जपानमधील मैत्री आणि सहकार्य अधिक मजबूत करणे, तसेच २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या सामन्याबाबत आनंद व्यक्त केला. भारतीय संघासाठी जपानमध्ये जाऊन टी-२० सामना खेळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सामन्यामुळे जपानसह पूर्व आशियातील भागात क्रिकेटला अधिक लोकप्रिय करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारत अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून, या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.