११ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा...जरांगे मुंबईसाठी सज्ज!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
अंतरवाली,
Jarange ready for Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने काल रात्री अंतरवाली येथे जरांगे यांची भेट घेत चर्चा केली. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड या शिष्टमंडळात सहभागी होते. जवळपास अडीच तास चर्चा झाल्यानंतरही तोडगा निघाला नाही आणि जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.चर्चेदरम्यान जरांगे यांनी सरकारसमोर नवी अंतिम मुदत ठेवली. ११ सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, त्यानंतरच उपोषण मागे घेऊ, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ११ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत गुलाल घेऊन जाण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर १२ सप्टेंबरच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल, असे जरांगे यांनी सांगितले.
 
 
jarange
 
सरकारच्या शिष्टमंडळाकडून मात्र उपोषण मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात आली. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, जरांगे यांनी प्रकृतीचा विचार करून उपचार घ्यावेत आणि आंदोलनाला तात्पुरती स्थगिती द्यावी, असे आवाहन प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनी केले. जरांगे यांच्या संघर्षामुळे मराठा आरक्षणासंदर्भात अनेक मागण्या मान्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आंदोलन थांबवण्यास किंवा स्थगित करण्यास जरांगे यांनी स्पष्ट नकार दिला. पाणी पिण्यास आणि सलाईन लावण्यास तयार असल्याचे सांगत त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मंत्र्यांच्या शब्दाला मान देत एका ऐवजी दोन सलाईन लावून घेईन, पण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
 
 
आपली प्रकृती आता साथ देत नसल्याचे सांगताना जरांगे यांनी यापुढे उपोषण करणे शक्य नसल्याचेही म्हटले. यापुढे उपोषण केले तर जीव जाऊ शकतो, त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या आताच मान्य करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ११ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मुंबईबाबत पुढील निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, ४ सप्टेंबरपासून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. संबंधितांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत आणि अर्ज करताना काही अडचणी आल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. जरांगे यांनी १० सप्टेंबरपर्यंत सरकारकडून निर्णयाच्या अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे. १० सप्टेंबरच्या आत निर्णयाची अंमलबजावणी झाली, तर सर्वांनी गुलाल घेऊन १२ सप्टेंबरला मुंबईला जावे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता १० आणि ११ सप्टेंबर या दोन तारखांकडे आंदोलनाच्या पुढील दिशेच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.