१४० पालख्या, ३५० कावड मंडळांची नोंदणी

सोमवारी कावड महोत्सव:श्री.राजराजेश्वर शिवभक्त मंडळाची पत्रकारपरिषदेत माहिती

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
अकोला,
kavad festival on monday श्रावण मासानिमित्त सोमवार, ७ रोजी ८१ वर्षांची परंपरा असलेला कावड पालखी महोत्सव अकोल्यात साजरा होणार आहे.या उत्सवात १४० पालख्या आणि ३५० कावडींची नोंदणी झाली असल्याची माहिती श्री. राजराजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
kavad festival on monday
 
शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम चा पूर्ण नदीवरून कावड द्वारे जल आणून श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी जलाभिषेक करण्याची गेल्या ८१ वर्षापासून ची मोठी परंपरा आहे. त्या पृष्ठभूमीवर मंदिर प्रशासन व पालखी मंडळाची तयारी सुरू आहे. श्री.राजराजेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने रविवार, ६ रोजी श्री राजराजेश्वराची पालखी रात्री ९ वाजता श्री.राजराजेश्वर मंदिरातून ट्रॅक्टरद्वारे गांधीग्राम (वाघोली)कडे प्रस्थान करणार आहे. रात्री १२ वाजता गांधीग्राम येथे घाटावर पूजा व आरती हाेईल.
 
  
त्यानंतर पालखी पाचमोरी येथे विश्रामासाठी थांबणार आहे. सोमवारी पहाटे ५ वाजता पाचमोरी येथून पालखी पुढे मार्गस्थ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पालखीचे श्री.राजराजेश्वर मंदिरात आगमन हाेईल. कावड यात्रेदरम्यान भाविकांकडून श्री राजराजेश्वराच्या जयघोषात तसेच धार्मिक वातावरणात सर्व पालखीचे स्वागत केले जाणार आहे.दरवर्षी उत्कृष्ट पालखी व कावडींना बक्षिसे देण्यात येतात. यंदाही आकर्षक सजावट, धार्मिक देखावे आणि शिस्तबद्ध पालखी व कावड असणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी, गजानन नंदाने, विनोद आगरकर, राजेश नाईक, राम भिरड, रमेश मेहरे आदी उपस्थित होते.
 
असा असेल पालखीचा मिरवणूक मार्ग
पाचमोरी, आकोट फैल, श्री शिवाजी महाविद्यालय , मनकर्णा प्लॉट, मानेक टॉकीज, टिळक रोड, जुना कॉटन मार्केट, सराफा बाजार, गांधी चौक, सिटी कोतवाली, मोठा पूल, जयहिंद चौक, श्री राजराजेश्वर मंदिर