दुबई,
Mandhana breaks Mithali's record. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत एकाच डावात दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. महिला आशिया कपमधील या सामन्यात मंधानाने 124 धावांची खेळी करत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होण्याचा मान मिळवला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचाही विक्रम तिने आपल्या नावावर केला.मंधानाने हाँगकाँगविरुद्ध 64 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. या खेळीदरम्यान तिने 10,869 धावांचा टप्पा गाठत मिताली राजचा 10,868 धावांचा विक्रम मागे टाकला. मंधानाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकूण धावसंख्या आता 10,880 झाली आहे. याआधी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर होता.

मंधानाच्या या शतकी खेळीमुळे आणखी एक मोठा विक्रमही मोडला. तिचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे शतक ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगचा 17 शतकांचा विक्रम मागे पडला. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता मंधाना 18 शतकांसह अव्वल स्थानी आहे. मेग लॅनिंग आणि लॉरा वॉल्व्हार्ड यांच्या नावावर प्रत्येकी 17 शतके आहेत. हेली मॅथ्यूजने 15, तर सुझी बेट्स आणि टॅमी ब्यूमोंट यांनी प्रत्येकी 14 शतके केली आहेत.हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 गडी गमावून 193 धावा केल्या आणि हाँगकाँगसमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले. मंधाना वगळता भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. शेफाली वर्माने 17 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावा करत संघासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला 15 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. हाँगकाँगकडून मरीना लॅम्पलॉफने दोन बळी घेतले.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मृती मंधाना 10,869*धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मिताली राजने 10,868, सुझी बेट्सने 10,740, शार्लट एडवर्ड्सने 10,273, तर स्टेफनी टेलरने 10,007 धावा केल्या आहेत. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मृती मंधाना 18 शतकांसह आघाडीवर आहे. तिच्यानंतर मेग लॅनिंग आणि लॉरा वॉल्व्हार्ड प्रत्येकी 17 शतकांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. हेली मॅथ्यूज 15, तर सुझी बेट्स आणि टॅमी ब्यूमोंट प्रत्येकी 14 शतकांसह पुढे आहेत.