नवी दिल्ली,
Meloni's record and Modi's best wishes इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देशाच्या युद्धोत्तर इतिहासातील एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा मान मेलोनी यांना मिळाला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे अभिनंदन केले. मेलोनी यांच्या नेतृत्वावर इटालियन नागरिकांनी दाखवलेला विश्वास या विक्रमातून दिसून येतो, असे मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून मेलोनी यांचे कौतुक केले. भारत आणि इटलीमधील विशेष सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यामध्ये मेलोनी यांच्या मैत्रीची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. दोन्ही देशांमधील सहकार्य भविष्यातही अधिक दृढ होत राहावे आणि भारत-इटलीच्या नागरिकांसाठी समृद्ध भविष्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मेलोनी यांच्या पुढील यशासाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.४९ वर्षीय जॉर्जिया मेलोनी यांनी २२ ऑक्टोबर २०२२ रोजी इटलीच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. गुरुवारी १,४१३ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम केला. इटलीच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरही दीर्घकाळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम नोंदला गेला आहे. १० जून २०२६ रोजी मोदी यांनी सलग ४,३९९ दिवस पंतप्रधानपदावर राहून भारताचे सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. यासह त्यांनी स्वतंत्र भारतातील सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ४,३९८ दिवस निवडून आलेले पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर ९ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधीसह नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाली.