खासदार पुन्हा पालकमंत्र्यांवर भीडले; कारागृहाला विरोध

ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृहाचे जतन करा

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
वर्धा,
mp clashes with guardian minister again वर्धा येथील सन १८६७ मध्ये बांधण्यात आलेले १८० वर्षांची परंपरा असलेले इंग्रजकालीन ऐतिहासिक जिल्हा कारागृह पाडण्याला खासदार अमर काळे यांनी विरोध केला आहे. कारागृह नवीन बांधण्याचा प्रस्ताव असुन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हे कारागृह मंजूर करून आणले. आता ती वास्तू पुरातन म्हणून जतन करण्याच्या मागणीचे पत्र खा. काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खा. काळे थार येथील घटनेवरून आ. सुमित वानखेडे यांच्यावर भीडले होते. त्यापूर्वी हिंगणघाट येथील कार्य़क्रमात पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या विरोधात भुमिका घेतली होती, हे उल्लेखनिय!
 

mp clashes with guardian minister again
 
खा. काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात वर्धा जिल्हा कारागृहाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणार्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या कारागृहात आपल्या शिक्षेचा कार्यकाळ व्यतीत केला आहे. ही इमारत आजही अत्यंत सुस्थितीत आणि भरभक्कम असताना ती पाडणे म्हणजे शहराचा आणि देशाचा गौरवशाली इतिहास पुसून टाकण्यासारखे असल्याचे पत्रात नमुद केले असल्याचे जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. वाढत्या गुन्हेगारी व क्षमतेचा विचार करता नवीन वाढीव क्षमतेची इमारत इतरत्र बांधण्यास विरोध नाही. परंतु, जुनी वास्तू कोणत्याही परिस्थितीत पाडली जाऊ नये, असेही नमुद केले आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय संपत्तीची जपणूक करावी. शासकीय जमिनी व मालमत्ता शासकीय उपयोगातच आणा. अशीही मागणी खा. काळे यांनी केली आहे.