भाजपच्या प्रयत्नांना यश; डीजे बंदीबाबत सकारात्मक निर्णय

बेस साऊंडवर निर्बंध, टॉप व मिडल साऊंडला परवानगी

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-dj-rules-updateनागपूर शहरात डीजे व साऊंड सिस्टिमवरील सरसकट बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टी नागपूर शहराच्या वतीने शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पोलीस आयुक्तांशी झालेल्या चर्चेदरम्यान डीजे व साऊंड सिस्टिमच्या वापराबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. नागरिकांना सर्वाधिक त्रास होणारा तसेच जास्त व्हायब्रेशन व ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेस साऊंडवर निर्बंध कायम ठेवण्यात येतील, तर टॉप व मिडल साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी राहणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी आश्वासित केले.या निर्णयामुळे ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल.
 

patil 
 
त्याचबरोबर डीजे व साऊंड सिस्टिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेक व्यावसायिक, कामगार व त्यांच्या कुटुंबांच्या रोजगारावरही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.तसेच साऊंड सिस्टिमच्या वापराबाबत निश्चित करण्यात येणारे हे नियम केवळ विशिष्ट उत्सवापुरते मर्यादित न ठेवता पुढील ३६५ दिवस सर्वांसाठी समान पद्धतीने लागू राहतील, असेही पोलीस आयुक्तांनी आश्वासित केले. त्यामुळे सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समान निकष लागू होतील आणि नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही.
 
यावेळी भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या भावना, कायदा व सुव्यवस्था, पर्यावरण संरक्षण तसेच डीजे व साऊंड सिस्टिम व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या रोजगाराचा विचार पोलीस प्रशासनाने करावा असे सांगून जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी लावून धरली तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानले.निवेदन देताना आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, शहर महामंत्री सर्वश्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, नगरसेविका लक्ष्मी यादव, दिलीप दिवे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.